Maharashtra Police | (Photo Credit - Twitter/ANI)

कोरलाई किनाऱ्यापासून 2.5 ते 3 नॉटिकल मैलांवर संशयास्पद पाकिस्तानी बोट दिसल्याच्या अलर्टनंतर रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर महाराष्ट्र पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली. ही बोट 'मुकद्दर बोया 99' असल्याची माहिती असून तिचा नोंदणी क्रमांक MMSI-463800411 असा आहे. ही माहिती ICG दिल्लीकडून ICG मुरुड यांना रविवारी देण्यात आली होती. या संवेदनशील माहितीवर तात्काळ कृती करत रायगडचे पोलीस अधीक्षक, अतिरिक्त SP, SDPO आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कोर्लई, रेवदंडा, JSW आणि साळव परिसरात त्वरित शोध व गस्त मोहीम सुरू करण्यात आली.

दोन तात्काळ प्रतिसाद पथके (QRT) आणि बॉम्ब शोध व निकामी करणारे पथक (BDDS) हेही तैनात करण्यात आले. जिल्ह्यातील 19 ठिकाणी सशस्त्र नाकाबंदी करण्यात आली. संशयित वाहने व व्यक्तींची चौकशी करण्यात आली आणि हॉटेल्स, लॉजेस व रिसॉर्ट्सची पाहणी झाली. स्थानिक मच्छीमार व रहिवाशांना सतर्क करण्यात आले असून, कोणतीही संशयास्पद बोट किंवा व्यक्ती दिसल्यास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ड्रोनच्या मदतीने हवाई पाहणी करण्यात आली असून, समुद्री गस्त वाढवण्यात आली आहे.

इंडियन नेव्ही, कस्टम्स, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या समन्वयाने संयुक्त तपास करण्यात आला. किनाऱ्यालगत, जेट्टीजवळ, खाडीत उभ्या असलेल्या बोटींची तपासणी झाली. या ऑपरेशनमध्ये रायगड पोलिसांनी 52 अधिकारी आणि 554 पोलीस कर्मचारी तैनात केले होते. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व शेजारच्या जिल्ह्यांना देखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तपासानंतर, ही संशयास्पद वस्तू प्रत्यक्षात GPS ट्रॅकर लावलेला मासेमारीसाठी वापरला जाणारा buoy असल्याचे निष्पन्न झाले. जाळे समुद्रात बुडू नयेत व परत मिळवता यावेत यासाठी असे buoy वापरण्यात येतात. पोलिसांनी सांगितले की, याआधी 3 जानेवारी 2025 रोजी ओखा, गुजरात येथे अशाच प्रकारची बोट आढळळी होती.