J&K; Police and Security Forces (Photo Credits: X/@ANI)

मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terrorist Attack) 26 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. स्थानिक पोलिसांनी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची यादी जाहीर केली आहे. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेक लोक महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी फक्त पुरूषांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले आणि त्यांना कलमा म्हणण्यास सांगितले आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडून लक्ष्य हत्या सुरू केली. आता या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह त्यांच्या घरी पाठवण्यास सुरुवात झाली आहे.

याबाबत मुख्यमंत्री एकंठ शिंदे यांनी माहिती देत सांगितले की, ‘पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले. संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल. हे विमान श्रीनगर येथून दुपारी 12.15 वाजता निघेल. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव हे सायं. 6 वाजता निघेल आणि पुण्यात आणण्यात येईल. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन दुपारी 1.15 वाजता श्रीनगर येथून विमान निघेल आणि ते मुंबईत पोहोचेल.’

ते पुढे म्हणतात, ‘मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबई विमानतळ येथे समन्वयासाठी असतील, तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना होत आहेत. इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहेत.’ मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत तत्परतेने करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः कार्यरत आहे. (हेही वाचा: Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील 67 पर्यटकांचा गट थोडक्यात बचावला; घरी परतण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे मागितली मदत)

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांचे मृतदेह आज मुंबई व पुण्यात आणले जाणार-

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ने नागरिकांना आवाहन केले आहे की, पहलगाम येथे आपल्या जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास त्याची माहिती तात्काळ 9372338827 आणि 7304673105 या क्रमांकांवर जिल्हा प्रशासनास कळवावी. त्याचप्रमाणे श्रीनगरमध्ये पर्यटकांसाठी 24/7 मदत कक्ष सुरू करण्यात आला असून जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात 24 तास कार्यरत असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि मदत डेस्क स्थापित करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून पर्यटकांना कोणत्याही वेळी मदत मिळू शकेल. त्यांना काही अडचण आल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत ते खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात:

दूरध्वनी क्रमांक:

0194-2483651

0194-2457543

व्हॉट्सॲप क्रमांक:

7780805144

7780938397