पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील 67 पर्यटकांचा गट थोडक्यात बचावला

मंगळवारी जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terrorist Attack) किमान 26 जणांचा मृत्यू झाला असून, ज्यामध्ये बहुतेक पर्यटक होते. मृतांमध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटकांचाही समावेश आहे. पुण्यातील 67 पर्यटकांचा गट या हल्ल्यात थोडक्यात बचावला असून, त्यांनी महाराष्ट्र सरकारला त्यांना सुरक्षित घरी परतण्याची सुविधा देण्याचे आवाहन केले आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडीओ बनवला आहे. गटातील एका पर्यटकाने सांगितले की, ‘आमचा 67 पर्यटकांचा गट काश्मीरला आला आहे. ज्यावेळी हल्ला झाला तेव्हा आम्ही पहलगामपासून फक्त 3-4 किलोमीटर अंतरावर होतो.’

ते पुढे म्हणतात, ‘हल्ल्याची माहिती मिळताच आम्ही आमचा मार्ग बदलला आणि श्रीनगरला आलो. इथे जशी जागा उपलब्ध होईल तसे आम्ही राहिलो. आमच्यासोबत बरीच मुले आणि वृद्ध पर्यटक आहेत. परिस्थिती खूपच वाईट आहे. संपूर्ण काश्मीर बंद आहे. आमच्याकडे घरी परतण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. आम्ही महाराष्ट्र सरकारला घरी सुरक्षित पोहोचण्यास मदत करण्याची विनंती करतो.’ हेसार्वजन दौंड-शिरूर परिसरातील रहिवाशी आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील 67 पर्यटकांचा गट थोडक्यात बचावला:

दुसऱ्या पर्यटकाने सांगितले की, ‘आम्ही केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोललो. त्यांचा प्रतिसाद सकारात्मक होता. त्यांच्याशी बोलल्यानंतर आम्हाला वाटते की आम्हाला लवकरात लवकर पुण्याला नेले जाईल. मात्र, येथील परिस्थिती खूपच तणावपूर्ण आहे. मुले आणि महिला घाबरल्या आहेत. आम्हाला भारतीय सैन्य आणि सरकारवर विश्वास आहे. आम्ही स्वतः पुण्याला जाण्यासाठी आणि आमचा जीव धोक्यात घालण्यासाठी कोणतेही पाऊल उचलणार नाही. म्हणून, आम्ही सरकारला आम्हाला ताबडतोब घरी पोहोचवण्याची विनंती करतो.’ (हेही वाचा: 'Surgical Strike 3.0': पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू; संतप्त नेटिझन्सनी पाकिस्तानविरुद्ध सर्जिकल स्ट्राइकसह कठोर सूड घेण्याची मागणी)

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात राज्यातील पाच पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. जम्मू आणि काश्मीर प्रशासनाकडून (महाराष्ट्रातील पर्यटकांची) यादी मिळाल्यानंतर, लवकरच सर्वांना परत आणण्याची व्यवस्था केली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र सरकारने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील व्यक्तींचे मृतदेह परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेल्या राज्यातील लोकांच्या कुटुंबियांशी बोलले असून, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.