BJP Leader Devendra Fadnavis | (Photo Credits: IANS)

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका गाडीत आढळलेली स्फोटक आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मुंब्रा येथे आढळलेला मृतदेह या प्रकरणांमुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारणाने चांगलेच पेट घेतला आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांना एनआयएने आज अटक केली आहे. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही याप्रकरणात आक्रमक भुमिका घेतली आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर फडणवीस यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला आहे. दरम्यान ते म्हणाले की, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. माझ्याकडे जेव्हा हे प्रकरण आलं तेव्हा असं वाटलं की पोलीसच असे वागत असतील तर काय? सरकारने या प्रकरणात पाठीशी घातले आहे. हे केवळ सचिन वाझे यांच्या पुरते मर्यादित नाही. कोण कोण यामाध्ये आहे? कोणाला याचा पाठिंबा आहे? कुणी कुणी या प्रकरणात काय काय भूमिका निभावली आहे? या सर्व गोष्टी बाहेर येणं आवश्यक आहे. मला असे वाटते की, आता ही नुसती सुरूवात झाली आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत. हे देखील वाचा-Sachin Vaze Arrested : भाजपकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न; नाना पटोले यांचा पलटवार

मुकेश अंबानींच्या घराजवळ स्कॉर्पिओ गाडीत स्फोटक ठेवल्याच्या प्रकरणात एनआयएने शनिवारी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी केली होती. दरम्यान, तब्बल 13 तास चौकशी केल्यानंतर सचिन वाझे यांना अटक शनिवारी अटक करण्यात आली आहे. या आरोपासह इतर कलमान्वये वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन वाझे यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाच्या कटात 5-7 जणांचा समावेश होता. त्यामुळे या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील आणखी काही अधिकाऱ्यांची देखील चौकशी होऊ शकते, अशीही माहिती समोर येत आहे.