'तुमच्यात हिंमत असेल तर, पुन्हा निवडणूक लढू...' विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान
Devendra Fadnavis And Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची (Maha Viaks Aghadi) सत्ता स्थापन झाल्यापासून विरोधकांकडून राज्य सरकारवर वारंवार टीका केली जात आहे. यातच विरोधीपक्षनेते नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही यात आणखी भर टाकली आहे. नवी मुंबईत (Navi Mumbai) झालेल्या भाजपच्या (BJP) अधिवशेनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि महाविकास आघाडीतील इतर नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. तुमच्यात हिंमत असेल तर, पुन्हा निवडणूक लढू. आम्ही एकटे असलो तरी पुन्हा तिघांना पुरून उरू, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. तसेच आम्ही सरकार खाली खेचणार नाही, पण तुमची हिंमत असेल तर चला पुन्हा लोकांच्या कोर्टात असेही फडणवीस म्हणाले आहेत. यावर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप- शिवसेनेने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकत्रित लढवली होती. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला होता. दरम्यान, शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीतसह हात मिळवणी करत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. परिणामी, भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले होते. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी आक्रमक भुमिका घेत महाविकास आघाडीवर शाब्दिक हल्ला चढवत आहेत. नुकतेच नवी मुंबई येथे भाजपचे अधिवेशन पार पडले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टिकास्त्र सोडले आहे. तुमच्यात हिंमत असेल तर, पुन्हा निवडणूक लढा, आम्ही एकटे असलो तरी तिघांना पुरून उरू, असे फडणवीस म्हणाले आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत म्हणाले की, 'सावरकरांवर टीका करणाऱ्यांना हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेस्तनाबूत करायचे. मात्र, आता काँग्रेस सावकरांचा रोज अपमान करत आहे. हिंमत असेल तर शिदोरी मासिकावर बंदी घाला,' असेही फडणवीस म्हणाले आहेत. याशिवाय,  काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री बनवेल असे तुम्ही बाळासाहेबांना वचन दिले होते का? असा सवालही देवेंद्र फडणवीय यांनी उपस्थित केला आहे. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसीय कोकण दौर्‍यावर; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील विकासकामांचा घेणार आढावा

याआधीही देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर शाब्दिक हल्ला चढवला होता. देशातील महापुरुषांचा अपमान काँग्रेस नेहमीच करत आली आहे. विशेष म्हणजे, सत्तेत असलेली शिवसेनाही या अपमानाबद्दल काही बोलत नाही. काँग्रेसने पक्षाच्या मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल गलिच्छ भाषेत लिखाण केले आहे. तसेच, कोणताही अभ्यास न करता शिवसेना सावरकर यांचे समर्थन करत असल्याचे म्हटले आहे. यावरुन शिवसेनेवर निशाणा साधत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना याबाबत काही बोलणार आहे का? शिवसेना सत्तेसाठी किती काळ लाचारी करणार असा खोचक सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला होता.