State Assembly Budget Session 2021: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 1 ते 10 मार्च या कालावधीत पार पडणार आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. यावरून आता विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. यावर्षी कमी कालावधीसाठी अधिवेशन होत असल्याने विरोधकांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. आज विरोधी पक्षाने कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून सभात्याग केला. तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला चर्चेपासून पळ काढायचा आहे. त्यामुळे यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवण्यात आला असल्याचे म्हणत टीका केली आहे.
फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकारने अनेक जिल्ह्यात निर्बंध लावले आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने यंदा अर्थसंकल्पीय अधिवेशन केवळ 10 दिवसांच्या कालावधीसाठी ठेवले आहे. यावर्षी कोरोनामुळे पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन कमी कालावधीत आटोपण्यात आले. (वाचा - Maharashtra Assembly Budget Session 2021: विधिमंडळ अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपद निवडणूक होणार का? पाहा कोणकोणते चेहरे आहेत मैदानात)
दरम्यान, या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होण्याची शक्यता कमी आहे. ठाकरे सरकारमधील अनेक आमदारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे हे आमदार यंदा अधिवेधनात उपस्थित राहणार नाहीत. तसेच त्यांना मतदान करता येणार नाही.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेष काळजी घेतली जाणार आहे. आमदारांना बसण्यासाठी सभागृहात बैठक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. अर्थसंकल्पापूर्वी सर्व आमदारांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तसेच ज्या आमदारांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे, त्यांनाचं सभागृहात प्रवेश देण्यात येणार आहे.