महानगरातील वाढत्या गुन्हेगारी रोखण्यासाठी ऑपरेशन ऑल आऊटचा (Operation All Out) एक भाग म्हणून मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोठ्या संख्येने गुन्हेगारांना अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री 11 वाजल्यापासून तर, शनिवारी रात्री 2 वाजेपर्यंत सुरु होती. दरम्यान, ज्यांच्यावर गंभीर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आली आहे, अशा 362 आरोपींची चौकशी करण्यात आली आहे. तर, अवघ्या तीन तासात तब्बल 70 जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या या कामगिरीवर संपूर्ण शहरातून कौतूकाचा वर्षाव केला जात आहे.
या कारवाई दरम्यान पोलिसांनी तडीपार असूनही मुंबईत राहत असलेल्या 22 गुन्हेगारांना पकडले आहे. तसेच फरार असलेल्या 48 आरोपींनाही पोलिसांनी अटक केली हे. या कालावधीत एनडीपीएस कायद्यांतर्गत 53 प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. यापैकी 44 जण अमली पदार्थांचे व्यसन केलेले होते. दरम्यान, आरोपींकडून एमडी व गांजाही जप्त करण्यात आले आहेत. ऑपरेशन ऑलआउट दरम्यान पोलिसांनी 851 हॉटेल्स, महानगरातील लॉज आणि 862 ठिकाणी नाकेबंदी करून तब्बल 7 हजार 562 वाहनांची तपासणी केली आहे. हे देखील वाचा- Bharat Bandh: भारत बंदच्या दिवशी मुंबईत बेस्ट बस, टॅक्सी, रिक्षा सेवा प्रवाशांसाठी नेहमीप्रमाणेच सुरु राहणार
याव्यतिरिक्त, 189 कोबिंग ऑपरेशन आणि 428 ठिकाणी पायी गस्त देखील चालविली गेली. या कारवाई दरम्यान मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमधील पोलिस कर्मचारी ऑपरेशन ऑलआऊटमध्ये सहभागी झाले होते. मुंबई पोलिस प्रवक्त्या डीसीपी चैतन्य एस यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन ऑलआऊटने आरोपींची पार्श्वभूमी तपासून, संशयितांचा शोध घेण्यासाठी हॉटेल आणि पर्यटक खाणी शोधून काढणे, फरार आरोपींना पकडणे. तसेच संवेदनशील भागात गस्त घालून लोकांच्या सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणे, असे ऑल ऑऊट ऑपरेशनचा मुख्य हेतू होता.
बेकायदा कृत्ये आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ऑल ऑऊट ऑपरेशन राबविले जात आहे. दरम्यान, सर्व प्रकारचे गुन्हे, गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल, संवेदनशील ठिकाणी गस्त, नाकाबंदी आदी सर्व कार्यवाही केली जाणार आहे, असे कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त, विश्वास नागंरे पाटील म्हणाले आहेत.