Onions (Photo Credits: IANS)

परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातीव पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिकमधील लासलगावमध्ये कांद्याचे दर प्रचंड भडकले आहेत. लासलगाव बाजारात कांद्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले आहेत. कांद्याच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सोमवारी कांद्याची घाऊक किंमत 55.50 रुपये प्रति किलोग्रॅम होती. तसेच किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रतिकिलो 70 ते 80 रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. लवकरच कांद्याचे दर शंभरी गाठणार आहे. याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. (हेही वाचा - कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत)

मागील वर्षीच्या तुलनेत कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने हे दर वाढले आहेत. तसेच परतीच्या पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे खरिपात पेरण्यात आलेल्या कांदा पिकाचं नुकसान झालं. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकसह दक्षिण भारतातील राज्यात परतीच्या पावसाने कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे भारतीय बाजारपेठांमध्ये नवा कांदा उपलब्ध झाला नाही. परिणामी कांद्याचे दर गगणाला भिडले आहेत.

हेही वाचा - कांद्याने 'साठी' ओलांडली; दरवाढ झाल्याने सामान्यांना सोसावी लागणार महागाईची झळ

येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत कांद्याचे दर शंभरी गाठणार असल्याचे घाऊक व्यापार्‍यांनी स्पष्ट केले. कांद्याचे दर स्थिर राहण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदी केली होती. पंरतु, तरीदेखील नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्यात सोमवारी कांद्याच्या दराने 62 रुपयांचा आकडा पार केला. नगर, नाशिक आणि पुणे येथील बाजार कांद्याची आवक कमी झाल्याने आठवडाभरात किलोमागे 16 रुपयांची वाढ झाली. तसेच मुंबई घाऊक बाजारात किलोमागे 26 रुपयांची वाढ झाली. डिसेंबरपर्यंत कांद्याचे दर असेच राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.