कांद्याने 'साठी' ओलांडली; दरवाढ झाल्याने सामान्यांना सोसावी लागणार महागाईची झळ
Onions (Photo Credits: IANS)

परतीच्या पावसाने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला झोडपले असून याचा परिणाम बाजारभावावर झाला आहे. यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाली असून कांदा (Onion) 60 रुपये किलोने विकला जाणार आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, आवक कमी झाल्याने कांद्याच्या दरात आठवड्याभरा किलोमागे 10 रुपयांची वाढ झाली आहे. कांद्यासह रोजच्या वापरातील अनेक भाज्यांच्या किंमती या 60 ते 80 रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत. परतीच्या पावसाने थंडाव्यासोबत महागाईची झळ देखील सामान्यांना सोसावी लागणार आहे.

कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली होती. केंद्र सरकारच्या निर्णयानंतरही कांद्याचे भाव वाढतच असल्याचे आढळून आले आहे. कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी नुकतेच देशांर्तगत बाजारपेठेत कांद्याचे भाव कमी होतील असे मत व्यक्त केले होते; परंतु कृषिमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतरही कांद्याच्या दरात घट होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत.

आठवडाभरात कांद्याच्या दरात घाऊक आणि किरकोळ बाजारात 10 रुपयांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवडय़ात घाऊक बाजारात 32 रुपयांना विकला जाणारा कांदा आता 42 रुपये प्रति किलोने विकला जात आहे. तर किरकोळ बाजारात 50 रुपये प्रति किलोने विकला जाणारा कांदा 60 रुपये प्रति किलोने विकला जात आहे.

हेदेखील वाचा- इजिप्तचा कांदा पुणे बाजारात दाखल; आकाराने मोठा असल्याकारणाने ग्राहकांनी फिरवली पाठ

आवक कमी असल्याने परदेशातून कांदा आयात करावा लागत आहे. ‘राज्यातील कांद्याचे नुकसान झाल्याने इजिप्तवरून कांद्याची आयात करावी लागत आहे. इजिप्तवरून आयात केलेल्या कांद्याचा माल खराब आल्याने त्याला बाजारात उठाव नाही. सध्या नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये नवीन कांद्याचे पीक बाजारात आल्यावर कांद्याच्या दरात घट होण्याची शक्यता’असल्याचे कांदा-बटाटा विभागाचे उपसचिव कृष्णकांत पवार यांनी सांगितले.

इजिप्तचा कांदा महाराष्ट्रात आला खरा मात्र हा कांदा आकाराने मोठा असल्याकारणाने या कांद्याला जास्त मागणी नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हॉटेल व्यावसायिक आणि खानावळ चालवणारे वगळता या कांद्याला पुणे बाजारात फारशी मागणी नाही.