कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत (PC - ANI)

राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असताना एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही. कांदा खायचा असेल तर 50-60 रुपये किलो दराने घेऊन खा. विनाकारणची ओरड करू नका, असं मत खोत यांनी व्यक्त केलं आहे. तसेच कांद्या दरावरुन ओरड करणाऱ्यांना जास्त दराने कांदा खाणं शक्य नसेल, तर शेती घेऊन कांदा पिकवा, असा सल्लाही दिला आहे. शुक्रवारी खोत निफाड येथे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते.

परतीच्या पावसामुळे राज्यातील खरीप हंगामातील पिक वाया गेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मंत्र्यांना शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सदाभाऊ खोत नाशिकमधील शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी खोत यांनी आपलं संतप्त मत व्यक्त केलं होतं. टीव्ही 9 मराठीने वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

वाचा - नाशिक: पिकाची नुकसान पाहण्यासाठी शरद पवार पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर

नेमकी काय म्हणाले सदाभाऊ खोत -

परतीच्या पावसाने यंदा कांद्याला मोठे नुकसान होणार आहे. परिणामी कांद्याचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कांदा 50-60 रुपये किलो दराने खावा लागला, तर खुशाल खाल्ला पाहिजे. कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही. कांदा हा काही अणुबॉम्ब नाही. शेतकरी 3 ते 4 महिन्यात लागेल तितका कांदा पिकवू शकतो. विनाकारण कांद्याची ओरड थांबवावी. तसेच ओरडणाऱ्यांनी शेती घ्यावी आणि ती करावी. कांद्याऐवजी स्वस्त भेटणारा टोमॅटो, फ्लॉवर खा. हे करूनही जिभेचे चोचले पुरवले जात नसतील, तर खुशाल शेती घ्या आणि कांद्याचे उत्पादन करा.

परतीच्या पावसाने निफाड तालुक्याला सोमवारी झोडपून काढले. यात द्राक्षबागा, कांदा, भुईमूग, बाजरी, मका, सोयाबीन या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सदाभाऊ खोत शुक्रवारी नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेत जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली