पंजाब-महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (PMC)आणखी एका खातेदाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अॅड्र्यू लोबो(Andrew Logo), असं मृत व्यक्तीचं नाव आहे. पीएमसी प्रकरणातील ही आठवी घटना आहे. आजारपणात रुग्णालयाचा खर्च करता न आल्याने अॅड्र्यू लोबो यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
74 वर्षीय अॅड्र्यू लोबो हे फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होते. लोबो ठाण्याजवळील काशेली येथे राहत होते. गुरुवारी लोबो यांचा राहत्या घरी मृत्यू झाला. अॅड्र्यू लोबो यांच्या खात्यात 26 लाखांची रक्कम जमा होती. त्यावरून मिळणाऱ्या व्याजावर त्यांचं घर चालत होतं. लोबो यांना आजारपणामुळे नियमित औषधं आणि आणि डॉक्टरांकडे तपासणीसाठी जावे लागत होते. परंतु, काही दिवसांपूर्वीच बँकेतील घोटाळ्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध घातले. त्यामुळे बँकेच्या इतर ग्राहकांप्रमाणेच अॅड्र्यू लोबो यांचे पैसेही बँकेत अडकले. त्यामुळे त्यांना पैसे काढता येत नव्हते. त्यामुळे पैशाअभावी लोबो यांना आपला जीव गमवावा लागला, असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे.
वाचा - PMC Bank Crisis: मुंबई मध्ये पीएमसी बॅंक खातेदार पुन्हा आक्रमक; रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा
गेल्या आठवड्यात पीएमसी बँकेत अडकलेले पैसे मिळतील की नाही, या चिंतेत असलेल्या एका खातेदार महिलेचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. कुलदिपकौर विग (वय 64) असे या महिलेचं नाव होतं. कुलदिपकौर व त्यांच्या कुटुंबीयांचे पीएमसी बँकेमध्ये सुमारे 17 लाख रुपये अडकले होते. कुलदिपकौर या रात्री पीएमसी बँकेसंदर्भातील बातम्या पाहून झोपी गेल्यानंतर दोन तासांतच त्यांचा हृदयविकराने मृत्यू झाला होता.
मुंबई उच्च न्यायालयामध्ये सोमवारी (4 नोव्हेंबर) पीएमसी खातेदारांनी आरबीआय विरोधात केलेल्या याचिकांवर सुनावणी पार पडली आहे. यामध्ये न्यायालयाकडून आरबीआयला 13 नोव्हेंबर पर्यंत अॅफिडेव्हिट सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पुढील सुनावणी 19 नोव्हेंबर दिवशी होणार आहे. मागील दीड महिन्यांपासून पीएमसी बॅंकेवर आर्थिक निर्बंध घालण्यात आल्याने खातेदारांना अकाऊंटमधून विशिष्ट रक्कमेच्या पलिकडे पैसे काढणं कठीण झालं आहे. हक्काचे पैसे अडकल्याने आर्थिक विवंचनेत अडकलेल्या अनेक पीएमसी बॅंक खातेदारांची गैरसोय होत आहे. या तणावाखाली येऊन आतापर्यंत 7 ते 8 पीएमसी बॅंक खातेदारांचा मृत्यू झाला आहे.