Maharashtra Cabinet Expansion: विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतर महायुती सरकारने राज्यात आपले सरकार स्थापन केले. मुंबईच्या आझाद मैदानावर झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, अद्याप महायुतीत खातेवाटपासंदर्भात निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आमि अजित पवार बुधवारी दिल्लीत दाखल झाले. या बैठकीत प्रत्येक सहा आमदारांमागे एक मंत्री या फॉर्म्यूल्यावर चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ललीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपाध्यक्ष जगदीप धनखर, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. याशिवाय अजित पवारही बुधवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी त्यांच्या गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी चर्चा केली. तथापी, या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते. त्यामुळे शिंदे यांच्या दिल्लीतील गैरहजेरीवरून राजकीय वतुर्ळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. (हेही वाचा - Maharashtra CM swearing-in Ceremony: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध (Watch Video))
प्राप्त माहितीनुसार, तानाजी सावंत, संजय राठोड, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला काहींचा आक्षेप असल्याची चर्चा आहे. अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत भाजप, शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार यांच्या गटातील मंत्रीपदांच्या वाटपाचा निर्णय होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रत्येक सहा आमदारांमागे एक मंत्रीपदाचा फॉर्म्युला यावर अमित शहा यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार आहे. (हेही वाचा -Amruta Fadnavis: तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून Devendra Fadnavis यांनी घेतली शपथ; जाणून घ्या त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल काही खास गोष्टी)
दरम्यान, मागील सरकारमध्ये अजित पवार गटाकडे नऊ मंत्रिपदे आणि उपसभापतीपद होते, ते कायम राहावी, असा पवारांचा आग्रह आहे. मंत्र्यांची संख्या कमी केल्यास, केंद्रातील एका मंत्रिपदाव्यतिरिक्त, त्यांच्या गटाचे प्रतिनिधित्व असलेल्या छोट्या राज्यात राज्यपालपद मिळवण्यासाठी पवार प्लॅन 'बी'वर चर्चा करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरू होत आहे. अमित शाह यांच्या भेटीनंतर 14 डिसेंबर ला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.