Who Is Amruta Fadnavis? आज, 5 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची (Maharashtra CM Devendra Fadnavis) शपथ घेतली. आझाद मैदानावर गुरुवारी सायंकाळी नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींदरम्यान फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचे नाव सध्या चर्चेत आहे. अमृता फडणवीस नक्की आहेत कोण? याबाबत अनेकजण उत्सुक आहेत. आपल्या कारकिर्दीत केवळ पतीला साथ देणारी पत्नीच नाही तर, एक सामाजिक कार्यकर्ता आणि बहुमुखी प्रतिभा असलेली महिला म्हणूनही त्यांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व सिद्ध केले आहे.
शिक्षण-
अमृता फडणवीस यांचा जन्म 9 एप्रिल 1979 रोजी नागपुरात झाला. त्यांचे वडील शरद रानडे नेत्रतज्ज्ञ आहेत. आई चारुलता रानडे या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. अमृता यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमधून घेतले. त्यानंतर जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्यानंतर पुण्याच्या सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून फायनान्समध्ये एमबीए केले.
करिअरची सुरुवात-
अमृता फडणवीस यांचा व्यावसायिक प्रवास 2003 मध्ये ॲक्सिस बँकेतून सुरू झाला, जिथे त्यांनी एक्झिक्युटिव्ह कॅशियर म्हणून काम केले. आज त्या बँकेच्या ट्रान्झॅक्शन बँकिंग विभागाच्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. अमृता यांचा लहानपणापासूनच शास्त्रीय संगीताकडे ओढा होता. गायन क्षेत्रातही त्यांनी भरीव यश संपादन केले आहे. प्रियांका चोप्रा स्टारर 'जय गंगाजल' या चित्रपटात त्यांनी आपला आवाज दिला आहे. या चित्रपटातील त्यांचे 'सब धन माती' हे गाणे खूप गाजले. यानंतर त्यांनी अनेक म्युझिक व्हिडिओसाठी गाणी गायली व अभिनयही केला. त्यांची गाणी अनेकदा सामाजिक संदेशांनी भरलेली असतात, जसे की महिला सबलीकरण आणि सामाजिक समस्यांवर जागरूकता पसरवणे.
समाजसेवा-
अमृता फडणवीस यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिले, तर त्यांच्या प्रोफाइलमध्ये त्या सामाजिक कार्यकर्त्या असल्याचा उल्लेखही आढळतो. त्या वंचित मुलांसाठी अनेक कार्यक्रम आयोजित करतात, तसेच महिला सक्षमीकरण उपक्रमांना पाठिंबा देत असतात. त्यांच्या पोस्टमध्ये ग्लॅमरस लूक आणि समाजकल्याणाबबत प्रेरणादायी पोस्टचा समावेश आहे. गायन आणि समाजसेवेसोबतच त्या राज्यस्तरीय टेनिसपटूही आहेत. 2018 मध्ये, त्यांची L&T मुंबई ओपन टेनिस स्पर्धेचे मुख्य संरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. (हेही वाचा: Maharashtra CM swearing-in Ceremony: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध)
उत्पन्न-
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अमृता यांचे उत्पन्न त्यांचे पती देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, अमृता फडणवीस यांनी 2019-2024 दरम्यान 5 कोटी 5 लाख रुपये कमावले. तर देवेंद्र फडणवीस यांची कमाई 1 कोटी 66 लाख रुपये आहे. याशिवाय अमृता यांनी अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली आहे. जर आपण देवेंद्र आणि अमृता या दोघांची मालमत्ता एकत्र जोडली तर एकत्रित संपत्ती 13.27 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये स्थावर मालमत्ता आणि 99 लाख रुपये किमतीचे 1.35 किलो सोने आहे. विशेष म्हणजे, एकट्या अमृता यांचा गुंतवणूक पोर्टफोलिओ 2019 मध्ये 2.33 कोटी रुपयांवरून 2024 मध्ये 5.62 कोटी रुपयांपर्यंत वाढला.