Teachers Day 2021: शिक्षक दिनानिमित्त राज्यात 'शिक्षक कार्य गौरव सप्ताह' राबवले जाणार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : Youtube)

Teachers Day 2021: कोरोना महामारीचा शिक्षण क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना संकटामुळे देशभरातील शाळा आणि महाविद्यालय गेल्या अनेक महिन्यांपासून बंदच आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. परंतु, या काळात दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नसल्याने अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन आणि समूह मार्गदर्शन वर्ग आयोजित केले आहे. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी अनेक शिक्षक झटताना दिसले आहेत. याचपार्श्वभूमीवर शिक्षण विभागातर्फे 5 सप्टेंबर रोजी राज्यात शिक्षक कार्य गौरव सप्ताह राबवण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा नियमितपणे सुरु करता आलेल्या नाहीत. या काळात दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले, यासाठी अनेक शिक्षक अहोरात्र झटताना दिसले आहेत. अशा सर्व शिक्षकांविषयी आदर आणि आभाप व्यक्त करण्यासाठी शासनाने येत्या 2 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान 'थॅंक अ टिचर' अभियांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरवले. शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. हे देखील वाचा- Thane Municipal Corporation: ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्तावर हल्ला करणाऱ्या आरोपीला 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

या कार्यक्रमाचे आयोजन करीत असताना राज्य शासनाने दिलेल्या कोरोना निर्बंधांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. सध्या देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, अद्यापही कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. तसेच येत्या सप्टेंबर किंवा आक्टोंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सरकार, महानगरपालिका आणि प्रशासनाकडून अधिक काळजी घेतली जात आहे.