Ganesh Festival 2023: गणेशोत्सवाला अगदी थोडे दिवस बाकी आहेत. अशातचं आता गणेशोत्सवानिमित्त पुण्यात पाच दिवसांच्या कालावधीत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. संपूर्ण शहरातील एकूण 2,200 मंडळांना यासंदर्भात अधिकृत परवानग्या देण्यात आल्या आहेत. राज्य विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी याबाबत माहिती दिली आहे. गणेशोत्सवाच्या 23 ते 28 सप्टेंबर या पाच दिवसांमध्ये लाऊडस्पीकरची मुदत शिथिल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांना प्रतिसाद देत, स्थानिक प्रशासनाने आगामी गणेशोत्सव सोहळ्यासाठी उत्सवाची भावना आणि भक्तांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत.
गणेशोत्सव उत्सवादरम्यान सलग पाच दिवस मध्यरात्रीपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास परवागनी देण्यात आली आहे. याशिवाय, भक्तांसाठी या विधीचे महत्त्व ओळखून गौरी देवतेच्या रात्री उशिरा विसर्जनाची परवानगी देण्यात आली आहे. या दिवसांत लाऊडस्पीकर मध्यरात्रीपर्यंत वाजवता येतात. सामान्य दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी असते. गणेशोत्सव, दहीहंडी आणि इतर आगामी सण शांततेत आणि उत्साहात साजरे व्हावेत, त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पाळल्या जाणार्या नियमांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महापालिकेचे अनेक अधिकारी उपस्थित होते. यावेळी गोर्हे यांनी सांगितलं की, गेल्या वर्षी गणपती मंडळांना दिलेले परवाने 2026 पर्यंत वैध असतील, त्यामुळे त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. ज्या मंडळांनी यापूर्वी परवानगी घेतली नाही त्यांनीच अर्ज करावा.
नीलम गोऱ्हे यांनी पुढे बोलताना सांगितलं की, हे सण साजरे करण्याबाबत नागरिकांनी आपल्या सूचना जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पोलिस आयुक्त कार्यालयाकडे द्याव्यात. प्राप्त झालेल्या सूचना व तक्रारींची प्रशासनाच्या वतीने सकारात्मक दखल घेऊन निराकरण करण्यात येईल. दहीहंडी उत्सव हा साहसी खेळ म्हणून ओळखला जात असताना, त्यानुसार सुरक्षेसाठी मुंबईच्या धर्तीवर जनजागृती प्रात्यक्षिके घेण्याच्या सूचना मंडळाला दिल्या असल्याचंही गोऱ्हे यांनी यावेळी नमूद केलं.