OBC Reservation: ओबीसी आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले ‘नव्या सरकारचा पायगुण चांगला, सरकारसाठी हा शुभसंकेत’
Eknath Shinde | (Photo Credits: Twitter/ANI)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी आरक्षण (OBC Reservation) मुद्द्यावर प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले आहे की, मी सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचं स्वागत करतो. नव्या सरकारचा पायगुण चांगला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा सरकारसाठी शुभसंकेतच' आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल ओबीसी राजकीय आरक्षण याचिकेवर आज (20 जुलै) सुनावणी झाली.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, बांठिया आयोगाचा अहवालानुसार राज्यात निवडणुका घ्या. ही निवडणूक प्रक्रिया पुढील 2 आठवड्यांमध्ये पूर्ण करण्यात यावी. राज्यातील 367 ठिकाणी निवडणुका घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आम्ही ओबीसी जनतेला जो शब्द दिला होता. तो आम्ही पाळला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मी आणि उपमुख्यमंत्री सातत्याने बोलत होतो. याच कामासाठी मी सलग तीन वेळा दिल्लीला गेलो. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी वरिष्ठ वकिलांशी सखोल चर्चा केली. त्यानंतरच न्यायालयात बाजू मांडली. हे नवे सरकार आहे. नव्या सरकारचा पायगून चांगला आहे. नव्या सरकारसाठी हे शुभसंकेत आहेत असे मानालयाल हरकत नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट वाद, सर्वोच्च न्यायालयात काय घडले? विधिज्ञ कपील सिब्बल आणि हरीश साळवे यांचा युक्तिवाद)

दरम्यान, शिवसेना पक्षात वेगळा गट स्थापन केल्यानंतर निर्माण झालेल्या पेचाविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. काळजी करण्याचे कोणतेच कारण नाही. आम्ही जे काही केले आहे ते विचारपूर्वकच केले आहे. लोकशाहीमध्ये सर्व नियम आणि कायदा मोडणार नाही याची काळजी घेऊनच आम्ही पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे आमच्यात कोणताही संभ्रमावस्ता नाही. आमच्या वकिलांनीही बाजू अगदी प्रभावीपणे पुढे मांडली. आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे आम्ही निर्धास्त आहोत, असेही शिंदे म्हणाले.