महाराष्ट्रामध्ये आता हळूहळू कोरोना संकट निवळत असल्याने परिस्थिती पुन्हा पूर्ववत होत असल्याची चिन्हं अनेक ठिकाणी दिसत आहेत. दरम्यान महाराष्ट्रात नोव्हेंबर 2021 महिन्यात 15 तालुक्यांमध्ये एकही कोविड 19 मृत्यू नोंदवण्यात आलेला नाही. यात विदर्भातील नऊ जिल्ह्यांपैकी अकोला, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, भंडारा, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम यांचा त्यामध्ये समावेश आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेत डेल्टामुळे याच भागांना पहिल्यांदा प्रभावित केले होते.
महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात 591 कोविड मृत्यू झाले आहेत. राज्यात ऑक्टोबर मध्ये 1013 आणि सप्टेंबर मध्ये 1645 मृत्यू झाले होते. काहि महिन्यांपूर्वी जशी दुसरी लाट जोर धरू लागली तशी मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या देखील वाढली होती. मृत्यूचा आकडा फेब्रुवारी 2021 मध्ये 1463 वरून 6070 झाला होता. एप्रिल आणि मे 2021 हे या वर्षातील सर्वात वाईट महिने होते. या काळात अनुक्रमे 29551 आणि 28664 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. नक्की वाचा: Nagpur: लसीचे एक किंवा दोन्ही डोस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही; नागपूर महानगरपालिकेचा मोठा निर्णय .
राज्यात धुळे आणि भंडारामध्ये अनुक्रमे एप्रिल आणि जून महिन्यापासून एकही मृत्यू नोंदवण्यात आलेला नाही. नंदूरबार आणि वाशिम मध्ये लवकरच एकही मृत्यू न झालेल्याचा 90 दिवसांचा टप्पा पूर्ण होणार आहे. सध्या राज्यात कोविड 19 मृत्यू 6 जिल्ह्यांमधून नोंदवले जात आहेत. त्यामध्ये मुंबई, अहमदनगर, सातारा, पुणे, रायगड, ठाणे यांचा समावेश आहे. अन्य 14 शहरातील मृत्यू नोंदवले जात आहेत मात्र ते एक अंकीच आहेत.
महाराष्ट्रात ज्या भागात रूग्णसंख्या कमी आहे किंवा मृत्यूसंख्या शून्य झाली आहे अशा ठिकाणी देखील हलगर्जीपणा न करण्याचे आवाहन टास्क फोर्सने सांगितले आहे.