Iqbal Singh Chahal (Photo Credits: ANI/Twitter)

मुंबई महापालिका आयुक्त (BMC Municipal Commissioner) इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) हे सध्या आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) प्रकरणात आयकर विभाग (Income Tax) चौकशी करत आहे. याच प्रकरणात आता आयकर विभागाने चहल यांना नोटीस पाठविल्याचे समजते. आयकर विभागाने चहल यांना तीन मार्च रोजीच नोटीस पाठवली होती. या नोटीशीत उपस्थित राहण्यासाठी 10 मार्चला उपस्थित राहण्याबाबतचा उल्लेख होता. दरम्यान, या नोटीशीला चहल यांनी काय उत्तर दिले याबाबत समजू शकले नाही.

मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर महापालिका टेंडरमध्ये भ्रष्टाचार केल्याचा काही भाजप नेत्यांनी आरोप केला होता. यावरुन सध्या जाधव यांची आयकर विभाग चौकशी करत आहे. हे प्रकरण 300 कोटी रुपयांच्या टेंडरसंदर्भात असल्याचे समजते. दरम्यान, चहल यांना आलेली नोटीस ही काही दिसांपूर्वी आली आहे. (हेही वाचा, Mumbai Lockdown: मुंबईत लॉकडाऊन लागणार का? मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केली दिशा)

आरोप आहे की, एप्रिल 2018 ते मार्च 2022 या काळात स्थायी समितीद्वारा काही कंत्राटे देण्यात आली. त्यासाठी काही ठरावही संमत करण्यात आले. या संदर्भातील सर्व कागदपत्रे घेऊन आयकर विभागाने पालिका आयुक्तांना बोलावले होते. याशिवाय मुंबई महापालिकेत पाठीमागील चार वर्षांमध्ये जी काही कंत्राटं देण्यात आली आणि ठराव संमत करण्यात आले या सर्वांची यादी घेऊन आयुक्तांना आयकर विभागाने बोलावणे धाडले होते.