उत्तर भारतीय लोकच मुंबई चालवतात. त्यांनी काम बंद केल्यास मुंबई ठप्प होईल, असं वादग्रस्त विधान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं आहे. नागपूरमधील उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत बोलताना निरुपम यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.
उत्तर भारतीय माणूसच मुंबई-महाराष्ट्र चालवतो. दूध विकण्यापासून टॅक्सी चालवण्यापर्यंत अशी सर्व कामं उत्तर भारतीयच करतात. कोणत्याही क्षेत्रात उत्तर भारतीय सक्रीय आहेत. रिक्षा-टॅक्सी चालवणं, फळं-भाज्या विकणं अशी कामे उत्तर भारतीयांच्या अखत्यारीत आहेत. त्याचबरोबर बांधकाम क्षेत्रात मजूर म्हणूनही उत्तर भारतीयांचे प्रमाण अधिक आहे. सर्व क्षेत्रात उत्तर भारतीयांनी वर्णी लावली आहे. हीच माणसं मुंबई चालवतात. त्यामुळे त्यांना काम बंद करायला भाग पाडू नका. उत्तर भारतीयांनी एक दिवस ठरवलं तरी मुंबईकरांना जेवायला मिळणार नाही. त्यांनी काम बंद केलं तर मुंबई-महाराष्ट्र ठप्प होऊ शकतो, पण तसं करायला आम्हाला भाग पाडू नका, असा अप्रत्यक्ष इशारा संजय निरुपम यांनी बोलताना दिला.
इतक्यावरच ते थांबले नाही तर पुढे ते म्हणाले की, "उत्तर भारतीय लोक क्षेत्रीय नाही तर राष्ट्रीय मानसिकतेचे असतात. गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले होत आहेत. पंतप्रधानांच्या गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले होत आहेत. पण एक दिवस मोदींनाही वाराणसीला जायचे आहे."