Maharashtra Crime News: मटणावरुन वाद, एकाने कापला मित्राचा गळा, दुसऱ्याने बायकोच्या डोक्यात घातला विळा
Crime | (File Image)

बायकोने स्वयंपाक करताना मटण (Non Veg Food) बनवले नाही आणि जेवताना ताटात भलतीच भाजी वाढली, याचा राग मनात धरुन पुण्यातील एका पठ्ठ्याने चक्क बायकोच्या डोक्यात विळा घातला. ही घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील येरवडा येथील सुभाषनगर परिसरात घडली. संदीप विष्णू मोरे ( वय ३३) असे आरोपीचे नाव आहे. दुसरी घटना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे घडली. या घटनेत पार्टीसाठी रानात गेलेल्या मित्रांमध्ये जेवताना ताटात मटणाचे पीस कमी दिल्यावरुन वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने एका मित्राने दुसऱ्याचा गळा चिरला. दोन्ही घटनांमध्ये वाद हा मटणावरुनच झाल्याचे पुढे आले आहे.

पुणे येथील घटनेमध्ये पती संदीप मोरे याने पत्नीला जेवणासाठी मटणाचा रस्का बनविण्यास सांगितले होते. मात्र, पत्नीने त्याकडे लक्ष न देता भलतीच भाजी बनवली यावरुन संदीप मोरे संतापला आणि त्याने हा प्रकार केला. संदीप याच्या 29 वर्षीय पत्नीने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. पत्नीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पतीला दारुचे व्यसन आहे. घटना घडली तेव्हाही तो दारु पिऊन आला होता. जेवणासाठी मटन न बनवल्याचा राग मनात धरुन त्याने आपल्या डोक्यात मासे कापायचा विळा घातला. इतकेच नव्हे तर त्याने आपल्या आईवडीलांनाही मारहाण केल्याचे पत्नीने तक्रारीत म्हटले आहे. पत्नीच्या तक्रारीवरुन येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 28 आणि 29 मे रोजी घडली. (हेही वाचा, http://cmsmarathi.letsly.in/lifestyle/food/this-year-this-dish-was-the-most-ordered-the-company-received-137-orders-per-minute-swiggy-announced-the-report-427653.html )

दुसरी घटना छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड तालुक्यात घडली. या घटनेतील सर्व आरोपी आणि मयत हे परप्रांतीय कामगार आहेत. सिल्लोड तालुक्यात ते कामानिमित्त येतात. जितेंद्र काशीराम धुरवे (वय 34 वर्षे, रा. हनुमंता टापू, ता. मुंडी, जि. खंडवा, मध्यप्रदेश) असे मयताचे नाव आहे. तर ओमजय जगदीश सुरेश रघुवंशी- ठाकूर (वय 35 वर्षे, रा. छोटी पोलिस लाइनजवळ, हरदा, मध्यप्रदेश) असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. दोघांमध्ये पार्टीमध्ये मटनाचे पीस वाढण्यावरुन वाद झाला होता.