COVID19 3rd Wave: मुंबईत लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. त्यासाठी नागरिकांकडून ही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशातच महापालिकेने हायकोर्टाला म्हटले की, कोविड19 ची तिसरी लाट येण्याची शक्यता वाटत नाही. न्यायधीश दिपांकर दत्ता आणि न्यायधीश गिरिश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला वरिष्ठ वकिल अनिल साखरे जे महापालिकेच्या वतीने कोर्टात दाखल झाले होते त्यांनी असे म्हटले की, 81 लाख लोकांनी कोविड लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच 42 लाख लोकांनी कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
साखरे यांनी असे म्हटले की, लसीकरणावर अद्याप काम सुरळीत सुरु आहे. त्याचसोबत लसीकरणाचा पुरवठा ही अपुरा पडत नाही आहे. मुंबई सुरक्षित आहे. त्यामुळे तिसरी लाट येईल असे वाटत नाही असे ही त्यांनी पुढे म्हटले.(Mumbai: मुंबईमध्ये लसीकरणाला वेग, 42 लाखांहून अधिक लोकांना मिळाले दोन्ही डोस- BMC)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी मार्च महिन्यात कोर्टात एक याचिका वकील ध्रुती कपाडिया आणि कुणाल तिवारी यांनी दाखल केली होती. त्यामध्ये केंद्र आणि सरकारने 75 वर्षावरीय वृद्ध खासकरुन जे बेडला खिळलेले आहेत त्यांना घरोघरी जाऊन लसीकरण देण्यासंदर्भात सांगितले होते.
साखरे यांनी असे म्हटले की, 2586 जण हे बेडला खिळलेले असून त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर 3941 जणांनी फक्त लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायलयाने निकाल दिला आहे. त्यावेळी त्यांनी लसीकरणाबद्दलची जी माहिती दिली गेली त्यावर समाधान व्यक्त केले आहे.