Bombay High Court On Navratri Celebration: दांडियासाठी मोठ्या आवाजात संगीत आणि DJ लावण्याची गरज नाही, नवरात्र पारंपारिक पद्धतीने साजरी करा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
Bombay High Court | (Photo Credits: ANI)

Bombay High Court On Navratri Celebration: सध्या सर्वत्र नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशातचं आता मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court)नवरात्रीच्या उत्सवासंदर्भात (Navratri Celebration) काही महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, 'नवरात्रीचा धार्मिक सण देवी 'शक्ती'ची पूजा करण्याबद्दल आहे. ज्यासाठी एकाग्रता आणि ध्यान आवश्यक आहे. हा सण गोंगाटाच्या वातावरणात साजरा केला जाऊ शकत नाही. त्यामुळे गरबा आणि दांडियासाठी डीजे, लाऊडस्पीकर आदी आधुनिक साऊंड सिस्टिम वापरण्याची गरज नाही.'

ध्वनी प्रदूषण नियम, 2000 अंतर्गत "सायलेंट झोन" म्हणून घोषीत केलेल्या खेळाच्या मैदानावर चालू असलेल्या नवरात्रोत्सवासाठी ध्वनी उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्याच्या आदेशाची विनंती करणाऱ्या याचिकेला उत्तर देताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे. (हेही वाचा - Garba in Times Square: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर महिलांनी केला गरबा, डान्सचा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क)

दरम्यान, न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्या खंडपीठाने नवरात्रोत्सवाच्या आयोजनावर आक्षेप घेत एका रिट याचिकेवर हा आदेश दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, नवरात्रीच्या उत्सवात देवतेची आराधना वेगवेगळी असू शकते. नवरात्रीत 'शक्ती'च्या रूपाची पूजा केली जाते. त्यामुळे यासाठी मोठ्या आवाजात संगीत लावण्याची आवश्यकता नाही.

याशिवाय न्यायालयाने असेही नमूद केले आहे की, शक्तीच्या देवीची पूजा तेव्हाच परिणामकारक ठरते जेव्हा ती कोणत्याही बाह्य व्यत्ययाशिवाय लक्ष देऊन केली जाते. मनाची पूर्ण एकाग्रता असल्याशिवाय कोणतीही पूजा आणि भक्ती शक्य नाही. भक्तांनी त्याच्या कृतींद्वारे उत्सवाच्या शिस्त आणि पावित्र्याचा त्याग होणार नाही याची खात्री केली पाहिजे, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.