No Marathi signboards Penalty: दुकानावर मराठी पाटी न लावल्याने 625 दुकानांवर कारवाई करत पालिकेने जमा केला 50 लाखांचा दंड
BMC (File Image)

मागील पंधरवड्यात मुंबई महापालिकेने मराठी नावाच्या पाट्या न लावल्याबद्दल मुंबईतील 625 दुकाने आणि आस्थापनांकडून 50 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. नोव्हेंबर 2023 पासून आतापर्यंत बीएमसी च्या रडार वर  आलेली ही दुकाने आणि आस्थापना आहेत. दरम्यान 1 मे 2024 पासून मराठी नावाच्या पाट्या नसलेली दुकाने आणि आस्थापनांना दुप्पट मालमत्ता कर लागेल असे बीएमसी ने जाहीर केल्यानंतर गेल्या पंधरवड्यात दंड भरण्याची घाई करण्यात आली आहे.

TOI शी बोलताना अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, 'जर पालिकेच्या अधिकार्‍यांनी भेट दिली आणि दुकानावर मराठी पाटी नसेल तर इन्सपेक्शन रिपोर्ट बनवला जातो. त्यानंतर दुकानदाराला बीएमसी मध्ये यावं लागतं किंवा कोर्टात जाऊन नियमांचं पालन केल्याचा पुरावा सादर करावा लागतो. सोबतच दंडाची देखील रक्कम भरावी लागते.'

नोव्हेंबर 2023 मध्ये बीएमसीने मराठी नावाच्या पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. बीएमसीने मंगळवारी जनतेला आवाहन केले आहे की मराठी नावाच्या पाट्या दिसत नसल्यास अशा दुकानांची आणि आस्थापनांची माहिती पालिकेला कळवावी.

मराठी पाटी नसेल तर दुप्पट मालमत्ता कर असे बीएमसीने या वर्षी एप्रिलमध्ये जाहीर केल्यानंतर, मराठी पाट्या लावणार्‍या दुकानांची संख्या प्रचंड वाढली आहे. "बीएमसीने गेल्या पंधरवड्यात केलेल्या 1,281 आस्थापनांपैकी 1,233 आस्थापनांच्या दुकानांवर मराठी भाषेत, देवनागरीत नेमप्लेट लावलेल्या आढळल्या" असे एका अधिकाऱ्याने सांगितले. MNS On Marathi Signboards on shops: 'मराठी पाट्या लावा अन्यथा..खळखट्याक' मनसे कार्यकर्त्यांचा बॅनरद्वारे मुंबईतील दुकानदारांना इशारा .

2022 मध्ये राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापन अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली होती, ज्यामुळे 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने आणि आस्थापनांना मराठी नावाच्या पाट्या लावाव्या लागतील.