No Horn Campaign: ठाणे शहरात 1 मार्च ते 31 मे 2023 या कालावधीत 'नो हॉर्न' मोहीम; वाढत्या ध्वनी प्रदूषणाला आळा बसण्याची शक्यता
Traffic | Representational Image | (Photo Credits: PTI)

मोठमोठ्या शहरात, महानगरात ध्वनी प्रदूषणामुळे (Noise Pollution) अनेक समस्या निर्माण होतात. मुंबईसारख्या रहदारीच्या शहरात ध्वनी प्रदूषणाची उच्च पातळी दिसून येते. आता उच्च डेसिबल हॉर्न (Horn) जोरात आणि सतत वाजवल्याने ठाणे (Thane) शहरामधील ध्वनी प्रदूषणातही वाढ झाली आहे. या ध्वनिप्रदूषणाला काही प्रमाणत तरी आळा घालण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने (TMC) रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंड आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 1 मार्च ते 31 मे 2023 या कालावधीत ‘नो हॉर्न’ मोहीम (No Horn Campaign) सुरू केली आहे.

रहिवासी क्षेत्र, शैक्षणिक मंच, ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या समन्वयाने ‘नो हॉर्न’ मोहीमेच्या जनजागृतीचे काम रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंड करणार आहे, अशी माहिती या उपक्रमाचे समन्वयक चरणजीत सिंग जस यांनी दिली.

याबाबत बुधवारी, 1 मार्च रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, उपायुक्त अनघा कदम, रोटरी क्लब ऑफ नॉर्थ एंडचे अध्यक्ष संदीप पहारिया, दिलीप माडीवाले, संजीव ब्रम्हे, राहुल खंडेलवाल, किरण झेंडे आदी उपस्थित होते. (हेही वाचा: राज्यभरात पारा वाढला; मुंबई, रायगड, कोल्हापूरसह विदर्भात 5 ते 7 मार्च दरम्यान पावसाची शक्यता- Report)

संदीप माळवी म्हणाले, ‘विनाकारण आणि सतत हॉर्न वाजवणे इतरांना त्रासदायक ठरते. एक जबाबदार नागरिक या नात्याने आपण हॉर्नचा वापर आवश्यकतेनुसार केला पाहिजे हे लोकांना समजावून सांगणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी जनजागृती केली पाहिजे. मला विश्वास आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेतल्यास शहरातील 'नो हॉर्न' मोहीम यशस्वी होईल.’

अवजड वाहनांच्या बाबतीत देखील वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली. टीएमसीच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी स्पष्ट केले की, वाहनांची संख्या दरवर्षी पाच टक्के दराने वाढत आहे आणि एकूण ध्वनी प्रदूषणात हॉर्नच्या आवाजाचे प्रमाण जवळजवळ 55 टक्के आहे, हे लक्षात घेऊन ‘नो हॉर्न’ मोहीम ही नक्कीच जनतेच्या हिताची ठरेल.’