No Honk Day: मुंबईत प्रत्येक बुधवार ''नो हॉर्न प्लीज', नियमभंग करणारांवर पोलीसांची कारवाई
Noise Pollution | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

मुंबई शहरात होत असलेले ध्वनिप्रदुषण रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणूनच मुंबई वाहतूक पोलीस 'नो हॉकिंग डे' (No Honk Day) ही संकल्पना घेऊन आले आहेत. या संकल्पनेनुसार शहरात आठवड्यातील किमान एक दिवस तरी सबळ कारणाशिवाय हॉर्न वाजवू नये. ज्यामुळे ध्वनिप्रदुषणाला काहीसा विराम मिळेल. त्यासाठी पोलिसांनी बुधवार हा दिवस निवडला आहे. या दिवशी 'हॉर्नला नाही म्हणा' (No Horn Please) त्यादृष्टीने जनजागृतीही झाली आहे. त्यासाठी चौक, नाके, जंक्शन आदींवर फलक लावण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी याबाबत एक ट्विटही केले आहे.

मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मुंबई वाहतूक पोलीस प्रत्येक बुधवारी No Honk Day मोहिम राबविणार आहेत. कोणत्याही सबळ कारणाशिवाय हॉर्न वाजविणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध वाहतूक विभाग कारवाई करणार आहे. आमचे स्वयंसेवक वेगवेगळ्या स्थानकांवर फलक घेऊन जनजागृती करणार आहेत'. (हेही वाचा, Mumbai: विनाकारण वाजणारे हॉर्न, मॉडीफाईड सायलेन्सरमुळे होणारे ध्वनी प्रदूषण थांबणार; पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी उचलली कठोर पावले)

ट्विट

मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असल्यामुळे मुंबईची रहदारी दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. त्यामुळे वाढती रहदारी, वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारे ध्वनिप्रदुषण रोखण्याचा प्रचंड ताण यंत्रणांवर येतो. परिणामी पोलिसांना 'नो हॉर्न डे' सुरु करावा लागला. या मोहिमेंतर्गत पोलीस ध्वनिप्रदुषणाचे दुष्परिणाम लोकांना समजून सांगतील. यासाठी विविध सामाजिक संस्थांचाही सहभाग घेतला जाईल. पोलिसांनी पाठिमागच्याच आठवड्यात 'हॉर्नला नाही म्हणा' हा उपक्रम राबविला. अवघ्या दोन तासांसाठी राबवलेला हा उपक्रम नागरिकांकडून अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळवताना दिसला. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आता आठवड्यातून एक दिवस हॉर्नला नाही म्हणा हा पर्याय निवडला आहे.