COVID 19  च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द,ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका नको: राष्ट्रवादीची भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेस (Photo Credits-Facebook)

मुंबई मध्ये आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची (NCP) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. एनसीपी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पक्षाच्या मंत्र्यांची व नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होती. यामध्ये सध्याच्या वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय झाले आहेत. सोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीबाबतही निर्णय झाले आहेत.

एनसीपी पक्षाचे जानेवारी 2022 मध्ये होणारे नियोजित शिबीर व इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. या बैठकीमध्ये आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे ही पक्षाची भूमिका असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. हे देखील वाचा: Sharad Pawar Statement: भाजपला 2019च्या निवडणूकीत राष्ट्रवादीसोबत युती करायची होती, मात्र मीच पंतप्रधानांना सांगितले ते शक्य नाही - शरद पवार .

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत न्यायालयीन लढा लढण्याची जबाबदारी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देण्यात आल्याचेही बैठकीत ठरल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणूका नकोत ही पक्षाची सुरुवातीपासून भूमिका आहे आणि तीच कायम राहील असेही बैठकीत चर्चा झाल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळेच पक्षाने नियोजित शिबीर व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. गर्दी होणार नाही असे कुठलेही कार्यक्रम मंत्री किंवा नेत्यांनी घेऊ नये असा निर्णय झाल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

मात्र मंत्री आणि पालकमंत्री व संपर्कमंत्री त्या - त्या जिल्ह्यात जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून माहिती घेतील. पक्षातंर्गत होणार्‍या निवडणूकीसाठी होणारी सदस्य नोंदणी कार्यक्रमाचीही चर्चा यावेळी झाली. शिवाय आगामी ज्या निवडणूका होणार आहेत त्याची तयारी पक्षाने केली आहे असेही नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.