देशासह महाराष्ट्रातही (Maharashtra) कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यासोबतच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत चालले आहे. पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchawad) कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हे प्रमाण कमी करणे अतिशय गरजेचे आहे. यातच खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील खासगी रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि हॉटेल ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. अजित पवार यांनी आज पुन्हा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली आहे. यावेळी पुणे आणि पिंपरी-चिंडवडमधील स्थितीची महिती घेण्यात आली आहे.
कोरोना नियंत्रणासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीत कोविड-19 बद्दल जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच दोन्ही महानगरपालिका करत असलेल्या उपाय योजनांबाबतही माहिती घेण्यात आली आहे. या बैठकीत केंद्र शासनाने मॉल्स व्यतीरिक्त इतर दुकाने सुरु ठेवण्याबाबत जो निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने राज्य शासन स्तरावर जे धोरण निश्चित करण्यात येईल. त्याप्रमाणे निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, अजित पवार म्हणाले की, कन्टेंन्मेट झोनमध्ये पोलीस प्रशासनाने लॉकडाऊनचे कडक निर्बंध राबवावेत. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले आहेत. क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना वेळेत आणि चांगल्या दर्जाचे भोजन मिळावे, शहरातील रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी झोपडपट्टी भागातील कुटुंबियांचे संस्थात्मक क्वारंटाईन करुन त्यांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याबाबत नियोजन करण्याचे, निर्देश अजित पवारांनी केले आहेत. हे देखील वाचा- Mumbai Coronavirus: मुंबईत कोरोना व्हायरसमुळे पोलिस हवालदाराचा मृत्यू, राज्यात एकूण 96 पोलिस संक्रमित
पुण्यात कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. यामुळे पुणेकरांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात पुढच्या 3 दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 500 तर, 15 मेपर्यंत 3 हजार वर जाण्याची शक्यता पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी शुक्रवारी वर्तवली होती. त्यामुळे लॉकडाऊनचे पालन तंतोतंत पद्धतीने करण्याचे आव्हान देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.