विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन्ही याद्यांमधून आपल्याला वगळण्यात आल्या कारणाने नाराज झालेले मनसेचे वाहतूक सरचिटणीनस नितीन नांदगावकर (Nitin Nandgaonkar) यांनी मनसेला (MNS) रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. 2 ऑक्टोबरला रात्री उशिरा मातोश्री निवासस्थानी जाऊन यांच्या उपस्थितीत नितीन नांदगावकरांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून हाती शिवबंधन बांधले. मनसेसाठी हा मोठा धक्का असून समर्थकांमध्येही ब-याच चर्चा रंगू लागल्या आहेत.
नितीन नांदगावकर हे गेल्या काही वर्षांपासून सोशल मिडियावर बरेच सक्रिय होते. तसेच मनसेच्या खळ्ळ खट्याक स्टाईलमुळे नितीन नांदगावकर हे चर्चेत आले होते. त्यांनी बरीच आंदोलने करुन अनेकांना न्यायही मिळवून दिला होता. मनसेच्या खळ्ळ खट्याक स्टाईलमुळे नितीन नांदगावकर हे चर्चेत आले होते. मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी डावलल्याने नितीन नांदगावकरांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना सरचिटणीस @NitinNandgaonk3 जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/tgVAVpmZmP
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) October 2, 2019
एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे नांदगावकर म्हणाले. तसेच येणा-या काळामध्ये आपण उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण राज्यभर भगवा फडकवणार आहोत असेही ते म्हणाले.
यापूर्वी मनसेने विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरे यांनी 100 जागांवर मनसे उमेदवार देणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर मनसेच्या आलेल्या उमेदवारांच्या दोन याद्यांमध्ये नांदगावकर यांना वगळण्यात आलं होतं. त्यामुळेच त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.