Nitin Desai Suicide | Twitter

प्रख्यात कला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांना आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील रायगड पोलिसांनी शुक्रवारी एडलवाईस ग्रुपच्या (Edelweiss Group) पाच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे खालापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत प्रथम माहिती अहवाल नोंदवण्यात आला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

नेहा देसाई यांनी तक्रारीत आरोप केला आहे की, कंपनीने घेतलेल्या कर्जाबाबत त्यांच्या पतीचा वारंवार मानसिक छळ होत होता आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. लगान, जोधा अकबर सारख्या प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपटांसाठी काम केलेल्या देसाई यांनी बुधवारी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील त्यांच्या स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

माहितीनुसार, कर्जदारांना 252 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याने त्यांची कंपनी डिफॉल्ट झाली होती आणि नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या मुंबई खंडपीठाने त्याविरुद्ध दिवाळखोरीची कार्यवाही सुरू केली होती. देसाई यांची कंपनी ND's Art World Pvt Ltd ने 2016 आणि 2018 मध्ये ईसीएल फायनान्सकडून दोन कर्जाद्वारे 185 कोटी रुपये कर्ज घेतले होते. व्याजासहित कर्जाची रक्कम 252 कोटी झाली होती. जानेवारी 2020 पासून त्यांना या कर्जाच्या परतफेडीचा त्रास सुरू झाला. इसीएल फायनान्स ही एडलवाईस समूहाची नॉन-बँकिंग फायनान्स शाखा आहे. (हेही वाचा: Nitin Desai Funeral: कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवाचं CM Eknath Shinde, Deputy CM Ajit Pawar यांनी जे जे रूग्णालयात घेतलं अंतिम दर्शन)

नितीन देसाई यांचे बुधवारी निधन झाले. अधिकृत माहितीनुसार देसाई यांनी बुधवारी सकाळी आपला एन.डी. स्टुडिओत आत्महत्या केली. नितीन देसाई आत्महत्येपूर्वी काही ऑडिओ रेकॉर्ड केले होते. नितीन देसाई यांनी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओमध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येसाठी एडलवाईस कंपनीशिवाय इतर कुणालाही दोष दिलेला नाही. एडलवाइज कंपनीमुळे नितीन देसाई कसे अडचणीत आले आणि आपली कशी फसवणूक झाली हे ऑडिओ क्लिपमध्ये सांगितले आहे. तसेच या स्टुडिओच्या माध्यमातून अनेक नवे कलाकार उदयास येणार असल्याने हा स्टुडिओ संबंधित कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थेला देऊ नये, असे देसाई यांनी त्यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे.