Balasaheb Thorat | (Photo Credit: Facebook)

भारतीय हवामान खात्याने (IMD) निसर्ग चक्रीवादळाचा (Nisarga Cyclone) इशारा दिला आहे. हे वादळ सोमवारी रात्रीपर्यंत समुद्रात खोलवर जाईल व त्यानंतर ते अजून उग्र रूप धारण करेल असे सांगितले आहे. सध्या हे वादळ गोवा, मुंबई आणि सूरत जवळील अरबी समुद्रावर आहे. हे चक्रीवादळ गोव्यातील पणजीच्या साऊथ वेस्ट येथे 360 कि.मी, महाराष्ट्रातील मुंबईच्या साऊथ वेस्ट येथे 670 किमी आणि गुजरातमधील सुरतच्या साऊथ-साऊथवेस्ट येथे 900 कि.मी. दूर आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Minister of Revenue Balasaheb Thorat) यांनी अरबी समुद्रात निर्माण होत असलेल्या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन, प्रशासन सजग असल्याचे सांगितले आहे.

थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीवर एनडीआरएफ (National Disaster Response Force) च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन पूर्वतयारी केली जात आहे.दुसरी गोष्ट म्हणजे, समुद्रात गेलेल्या सर्व बोटी बंदरात परत बोलावून घेतल्या आहेत. वादळाचा धोका असलेल्या भागातील जिल्हाधिकारी यांनी चक्रीवादळ पुर्वतयारी व उपाययोजनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय यंत्रणेसोबत बैठका घेऊन, उपाययोजनेबाबत चर्चा झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तालुका प्रशासनालाही योग्य सूचना दिल्या आहेत. सोबतच किनारपट्टीवरील नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. अशाप्रकारे महाराष्ट्र सरकार या वादळाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे, (हेही वाचा: Nisarga Cyclone Path: गोवा, मुंबई आणि सुरत जवळ निसर्ग चक्रीवादळ सोमवारी धडकणार, पहा कसा असेल चक्रीवादळाचा मार्ग आणि हालचाल)

हवामान एजन्सीने म्हटले आहे की, निसर्ग चक्रीवादळ हे 2 जून रोजी पहाटे पर्यंत उत्तरेकडील दिशेने सरकेल आणि त्यानंतर ते उत्तर-ईशान्येकडे वळेल. पुढे 3 जून, 2020 च्या संध्याकाळी/रात्री रायगड मधील हरिहरेश्वर आणि गुजरात मधील दमण असा उत्तर महाराष्ट्र व दक्षिण गुजरातचा पट्टा ओलांडेल. या वादळाबाबत खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत- 3, पालघर- 2, ठाणे, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग येथे प्रत्येकी एक अशा महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या एकूण 9 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी या चक्रीवादळाचा अधिक धोका असल्याचे हवामान सांगण्यात आले आहे.