![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/02/Newborn-380x214.jpg)
Newborn Girl Found Abandoned in Malad: मालाड (Malad ) पूर्व येथील एका रस्त्याच्याकडेला अत्यंत हृदयद्रावक प्रकाराचा सामना एका प्राणीमित्राला करावा लागला. रस्त्याच्या कडेने जाताना त्याला एका बेवारस गोणीमधून आवाज आला. त्याने त्या आवाजाकडे काळजीपूर्वक लक्ष वेधले असता तो आवाज कुत्र्याच्या पिल्लाचा असावा असे त्याला वाटले. त्याने गोणी सोडली. त्यानंतर त्याला जे दिसले त्याने तो गर्भगळीत झाला. गोणीत कुत्र्याचे पिल्लू नव्हे तर एक स्त्री जातीचे अर्भक (Baby Girl found in Street Sack) होते. मालाड परिसरातील जितेंद्र रस्त्यालगत असलेल्या उघड्या गटारातील पोत्यात हे बाळ आढळून आले.
गोणीमध्ये नवजात स्त्री अर्भक
प्राप्त माहितीनुसार, प्राणीमित्र हा जीवदया अभियान मालाड फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेशी संलग्न आहे. त्याने गोणी उघडली तेव्हा त्याला हे स्त्री जातीचे नवजात अर्भक पाहून त्याला धक्का बसला. विशेष म्हणजे अर्भकाची नाळ नुकतीच कापली होती आणि ती तशीच उघडी होती. एनजीओच्या स्वयंसेवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच, दिंडोशी पोलीस ठाण्यातही या घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी हे अर्भक ताब्यात घेऊन MW देसाई म्युनिसिपल हॉस्पिटल, मालाड (पूर्व) मध्ये दाखल केले. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना 27 जानेवारी दरम्यान घडली. रुग्णालयात अर्भकाची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात आले. (हेही वाचा, मुंबई: नवजात स्त्री अर्भकाचा 21 व्या मजल्यावरुन फेकल्याने मृत्यू; कांदिवली येथील लालजी पाडा परिसरातील घटना)
जगण्याची प्रचंड उर्मी पाहून नाव ठेवले 'जीविका'
अर्भकाची प्रकृती नाजू असूनही त्याच्या जगण्याच्या आदीम उर्मीमुळे त्याचे नाव 'जीविका' असे ठेवण्यात आले. आज जवळपास नऊ दिवस उलटून गेल्यानंतर अर्भकाच्या आरोग्यात लक्षनीय सुधारणा पाहायला मिळ आहे. प्राणीमित्र कार्यकर्त्याडॉ. नंदिनी कुलकर्णी यांनी जीविकाच्या संघर्षाचे आणि प्रतिकूल परिस्थितीतही जीवंत राहण्याचे कौतुक केले. यासोबतच त्यांनी या अर्भकाचा त्याग करणाऱ्या त्याच्या नैसर्गिक मातापित्याचा शोध घेण्यावरही विशेष भर दिला. जीवदया अभियान मालाड फाऊंडेशन संस्थेने वेळीच मदत आणि बचाव कार्य राबविल्याने नवजात अर्भकाचे प्राण वाचू शकले. दरम्यान संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नवजात अर्भकाला अशा प्रकारे बेवारस आणि बेजबाबदारपणे फेकून देण्याबद्दल संबंधितांना शिक्षा व्हावी अशी भावना व्यक्त केली. (हेही वाचा, धक्कादायक! गर्भापात करुन 5 महिन्याचे अर्भक नदीत फेकले; अनैतिक संबधातून कुमारी मातेने नवजात बाळाला जन्म दिल्याची शक्यता)
नवजात बेवारस अर्भके, लहान मुले आणि वृद्ध लोक हा एक नवाच सामाजिक चिंतेचा विषय ठरु पाहतो आहे. अनेकदा अकाली प्राप्त होणारे मातृत्व, असुरक्षीत लैंगिक संबंधांमधून होणारी गर्भधारणा, बलात्कार, काही जोडप्यांममध्ये कमालीचे दारिद्र्य यांमुळेही नवजात अर्भके, मुले यांचा त्याग केला जातो. वृद्ध लोकांमध्ये एकाकीपण, मुलांनी सांभाळण्यास नकार देणे यांशिवाय इतरही कारणामुळे वृद्धांवर रस्त्यांवर बेवारस भटकण्याची वेळ येते.