New Travel Guidelines For Maharashtra Airport: जोखीम असलेल्या देशांतून आलेले प्रवाशांसाठी 7 दिवसांचे क्वारंटाईन, 15 दिवसांच्या प्रवासाचा इतिहासही तपासला जाणार
coronavirus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

ओमिक्रॉन (Omicron Variant) कोविड-19 या नवीन स्ट्रेनमुळे निर्माण झालेल्या जागतीक धोक्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मंगळवारी प्रवाशांसाठी नवीन नियम जारी केले. दक्षिण आफ्रिकन देशांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना 7 दिवसांचे क्वारंटाईन करण्यात येईल. तसेच, राज्यात उतरणाऱ्या सर्व प्रवाशांचा 15 दिवसांचा प्रवासाचा इतिहास तपासला जाईल. जोखीम असलेल्या देशांतून आंतरराष्ट्रीय प्रवास करुन आलेल्या प्रवाशांच्या राज्य सरकारने नवी मार्गदर्शक तत्वे (New Travel Guidelines For Maharashtra Airport) जारी केली आहेत.  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड आणि विमानतळ प्राधिकरणाकडून स्वतंत्र काउंटरची व्यवस्था केली जाईल. या प्रवाशांची स्वतंत्रपणे चाचणी करुन त्यांना 2, 4 आणि 7 दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाईल. तसेच, त्यांची आरटीपीसीआर चाचणीही करण्यात येईल असे राज्य सरकारने म्हटले आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस संसर्गाचे भारतातील प्रमाण कमी आले असले तरी ओमिक्रॉन व्हेरीएंटने पुन्हा एकदा चिंता निर्माण केली आहे. भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंट असलेला कोरानाचा एकही रुग्ण आतापर्यंत आढळला नाही. परंतू, दक्षिण अफ्रिका आणि जोखीम अधिक असलेल्या देशांतून भारतात आलेल्या सहा प्रवासी कोरोना व्हायरस संक्रमित आढलले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे

महत्त्वाचे म्हणजे हे सहाही प्रवासी महाराष्ट्रात आले आहेत. प्राप्त माहितीनुसार ते कल्याण डोंबिवली, मुंबई महानगरपालिका (BMC), मीरा भाईंदर मनपा आणि पुणे या भागात आहेत. या सहा जणांना दक्षिण अप्रिकेतील ओमिक्रॉन व्हेरीएंटची बाधा झाली आहे किंवा नाही याबाबत निश्चित स्पष्टता अद्याप होऊ शकली नाही. या सर्वांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.