मुसळधार पावसाचा (Maharashtra Floods) राज्याला मोठा फटका बसला. त्यामुळे अनेक ठिकाणी गावे, शहरातील बाजारपेठा, पाडे उद्ध्वस्त झाले. दुर्घटनेत काही नागरिक ठार झाले. परंतू, या दुर्घटनेतून जे जगले, वाचले त्यांच्याही जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत मदतीची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. पीडितांच्या हाकेला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (27 जुलै) सांगितले की, राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून सुमार 16 हजार कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जाईल. मुंबई येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शरद पवार यांनी बोलताना सांगितले की, महाराष्ट्राला अशी संकटे नवी नाहीत. महाराष्ट्र या संकटातून उभा राहिल. महाराष्ट्राला अशा संकटांचा चांगला अनुभव आहे. राज्य सरकार झालेल्या नुकसानिची पाहणी करत आहे. आढावा घेत आहे. हा आढावा घेतल्यानंतर राज्य सरकार आवश्यक ती मदत आणि धोरण जाहीर करेल, असेही शरद पवार या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Maharashtra Rain Alert: मुसळधार पावसाची टांगती तलवार कायम; रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट)
शरद पवार यांनी सांगितले की, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं आहे. प्रामुख्याने सहा ते सात जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. यात प्रामुख्याने सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, कोल्हापूर, रायगड आदि जिल्ह्यांचा समावेश आहे. झालेले नुकसान अधिक मोठे आहे. नुकसानग्रस्तांना मदतीचा हात देणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांना मदत करण्याचे आणि हात देण्याचे काम राज्य सरकार कले. त्यासाठी राज्य सरकार अंतिम धोरण जाहीर करुन जबाबदारी घेईल, असेही शरद पवार यांनी या वेळी सांगितले.