कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संकटाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार प्रयत्नांची शिकस्त करत आहे. विविध उपाययोजना राबवून या विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहेत. अशात आता या लढ्यासाठी मदतीचे हात पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदारही आपला एक महिन्याचा पगार सहाय्यता निधीसाठी देणार आहेत. शरद पवार यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. सदर धनादेश प्रदेशाध्यक्ष श्री. जयंत पाटील यांच्याकडे जमा करावेत, असेही शरद पवार यांनी आपले आमदार व खासदार यांना सांगितले आहेत.
शरद पवार यांचे ट्वीट -
#Corona विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रशासन आणि राज्यशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. ह्या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. pic.twitter.com/EEEcYOXFr0
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 26, 2020
शरद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रशासन आणि राज्यशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसारखी पावले उचलावी लागल्याने, लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. या संकटात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जनतेसोबत ठाम उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक सामाजिक जबाबदारी म्हणून, राज्य व केंद्राच्या सदर सहायता कार्यास हातभार लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’
ते पुढे म्हणतात, ‘राज्य विधिमंडळ सदस्यांचे एक महिन्याचे वेतन 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी व संसदेतील सदस्यांचे एक महिन्याचे वेतन 'प्रधानमंत्री सहाय्यता निधी'ला देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.’ सदस्यांनी सदर धनादेश प्रदेशाध्यक्ष श्री. जयंत पाटील यांच्याकडे जमा करावेत असे सांगण्यात आले आहे. अशाप्रकारे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सरकारच्या कार्यात हातभार लावला जात आहे. दरम्यान, सध्याच्या लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत, सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने 24 तास उघडे ठेवण्याची परवानगी दिली आहे. (हेही वाचा: कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी राज्यात 22,118 खोल्यांची सज्जता, तर 55,707 खाटांची सोय- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती)
तसेच, गरजू व बेघर नागरिकांसाठी, नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी (Nagpur Collector) प्रायव्हेट कंपनीच्या सहकार्याने, ‘कम्युनिटी लंगर’ (Community Langar) असा उपक्रम सुरू केला आहे. त्याचप्रमाणे, विविध प्रायव्हेट कंपनीच्या आणि स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने, इतर शहरांसाठी ‘कम्युनिटी किचन & रेडी टू इट/रेडी टू कूक’ खाद्य सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.