Sharad Pawar Leaves for Karad: भारतीय राजकारणात सक्रीय असलेला सर्वात वृद्धत तरुण अशी ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) कराडच्या दिशेने रवाना झाले आहेत. कराड (Karad) येथे ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतील आणि पुन्हा एकदा आपल्या राजकीय वाटचाल आणि भूमिकांचा श्रीगणेशा करतील. राज्यात काल अभूतपूर्व सत्तानाट्य घडले. अजित पवार यांच्या रुपात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Political Crisis) पक्षात अभूतपूर्व फूट पडली. इतकेच नव्हे तर अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पहिल्या फळीतील तब्बल नऊ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे यांच्यासह इतरांचाही समावेश आहे. इतकेच नव्हे तर शरद पवार यांचे अत्यंत विश्वास समजले जाणारे प्रफुल्ल पटेल हे देखील अजित पवार यांच्या सोबत विरोधी पक्षासोबत गेले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात शरद पवार यांना मिळालेला आजवरचा हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाध्यक्ष या नात्याने शरद पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनिल तटकरे यांची पक्षाचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, या दोघांनीही पवार यांना धक्का देत अजित पवार यांच्या सोबत जाणे पसंत केले. (हेही वाचा, Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या आमदारांची फसवणूक करून स्वाक्षरी करण्यात आली, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप)
दरम्यान, राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी विरोधी पक्षात जाऊन जरी शपथ घेतली असली तरी, मला त्याचे नवल वाटत नाही. हा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही. यापूर्वीही माझ्यासोबत असलेल्या अनेकांनी विरोधी पक्षाची वाट धरली. इतकेच नव्हे तर माझ्यासोबत माझ्यासह केवळ पाचच लोक राहिले. असे असले तरी पुढच्या निवडणुकीत आम्ही पाचे 69 लोक निवडून आणले. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. उद्यापासून मी माझ्या पक्षाच्या बांधणीसाठी प्रयत्न करत आहे. आम्ही लोकांमध्ये जाऊ आणि जनतेच्या कोर्टाच दाद मागू असे म्हणत शरद पवार यांनी आपली वाटचाल स्पष्ट केली आहे.