Visuals from the site of IED blast | (Photo Credits: ANI)

गडचिरोली येथे झालेल्या भुसुरुंग स्फोट प्रकरणात (Gadchiroli Blast Case) कैलास रामचंदानी (Kailash Ramchandani) या संशयीत आरोपीस अटक करण्यात आली आहे. कैलास रामचंदानी हा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचा तालुका पदाधिकारी असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. गडचिरोली येथे जांभूळखेडा-लवारी गावादरम्यान असलेल्या नाल्यावर महाराष्ट्र दिन (1 मे) रोजी नक्षलवाद्यांनी भुसुरुंग स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात तब्बल 15 पोलीस आणि एक खासगी वाहनचालक शहीद झाले होते. ही घटना घडल्यापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. दरम्यान, पोलिसांना या प्रकरणाच्या तपासात मोठं यश आल्याचे समजते.

दरम्यान, 1 मे रोजी जांभूळखेडा-लवारी गावादरम्यान झालेल्या भुसुरुंग स्फोटापूर्वी एक दिवस आगोदर म्हणजेच 30 एप्रिल रोजी नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर (रामगड) येथील रस्त्याच्या कामावरील 27 वाहने आणि अन्य यंत्रसामग्री जाळून खाक केली होती. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोची प्रमुख नर्मदाक्का आणि तिचा पती किरणकुमार यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. या अटकेमुळे पोलिसांच्या हाती नक्षल्यांच्या माहितीचा एक मोठाच स्त्रोत हाती आल्याचे सांगितले जात होते.

दरम्यान, नर्मदाक्का आणि तिचा पती किरणकुमार यांनी चौकशीदरम्यान दिलेली माहिती आणि इतर अनेक तांत्रिक पुरावे यांच्या आधारी पोलीसांनी पाच जणांना अटक केली होती. दिलीप हिडामी, परसराम तुलावी, सोमनाथ मडावी, किसन हिडामी आणि सुकरु गोटा अशी अटक झालेल्या या पाच जणांची नावे आहेत. या पाचही जणांना पोलिसांनी वेगवेगळ्या दिवशी अटक केली होती.

कोण आहे कैलास रामचंदानी?

कैलास रामचंदानी हा गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे. तो तालुका पातळीवर पक्षाचे काम पाहतो. व्यवसायाने तो इलेक्ट्रिक कामेही करतो. तसेच, त्याचे कुरखेडा येथे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे दुकानही आहे. दरम्यान, त्याचा इतर व्यवसाय, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभुमी याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, भूसुरुंग स्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी अडकल्याने राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दिलीप हिडामी, परसराम तुलावी, सोमनाथ मडावी, किसन हिडामी आणि सुकरु गोटा यांच्याकडे केलेल्या चौकशीत कैलास रामचंदानी याचे नाव पुढे आले असल्याचे समजते. (हेही वाचा, गडचिरोली नक्षल चळवळीचे नर्मदा आणि राजन यांना अटक; महराष्ट्रदिनी घडवला होता IED blast)

नक्षली आणि राजकारण्यांचे लागेबांधे?

दरम्यान, भुसुरुंग स्फोटाच्या घटनेत रामचंदानी याची नेमकी काय भूमिका होती. त्याने या प्रकरणात कसा सहभाग घेतला होता. त्याचा या प्रकरणाशी काय कारणामुळे संबंध होता. तो नक्षलवाद्यांच्या संपर्कात आहे का. तसेच, राजकीय पक्ष आणि नक्षलवादी यांचे काही लागेबांधे आहेत का, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळायची आहेत. पोलिसांनी बारकाईने तपास सुरु केला आहे. या तपासात काय पुढे येते याबाबत उत्सुकता आहे.