शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी 'भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे' असं वक्तव्य केले होते. पण त्याचा अर्थ आज शरद पवारांनी ज्या प्रकारे उलगडला तो अनेकांच्या ध्यानी-मनी देखील नव्हता. शरद पवार यांच्या आत्मचरित्रांच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाचा मुहूर्त साधत त्यांनी आपण एनसीपी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून पायउतार होत असल्याचं जाहीर केलं आहे. शरद पवार यांच्यानंतर पक्षाच्या अध्यक्ष पदावर कोण? हा तिढा सोडवण्यासाठी त्यांनी एक समिती याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. अजित पवार यांनीही कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षातील दिग्गजच या कमिटीमध्ये आहेत. असं सांगत आपल्यावर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, एनसीपीच्या बैठकीमध्ये शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, पुतणे अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, अनिल देशमुख, केके शर्मा, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आदींचा समावेश आहे. आज शरद पवार यांच्या निवासस्थानी याबाबतच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. Sharad Pawar NCP Chief Resignation: यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान बाहेर उपोषणाला बसलेल्या एनसीपी कार्यकर्त्यांच्या मनधरणीचे सुप्रिया सुळे, अजित पवार यांचे प्रयत्न सुरूच (Watch Video) .
वायबी सेंटर मध्ये शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर एनसीपी मधील सार्याच ज्येष्ठ नेत्यांनी आपलं जाहीर मत मांडताना शरद पवार यांच्याशिवाय पक्ष चालवायचा कसा? असा प्रश्न विचारत तुम्ही तातडीने हा निर्णय मागे घ्या, असा परस्पर निर्णय घेणं आम्हांला पटणारा नाही असे म्हणत पुन्हा विचार करण्यास सांगितलं आहे. परंतू केवळ अजित पवार यांची भूमिका या सार्यांपेक्षा थोडी वेगळी असल्याचं जाणवलं आहे. दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या मनधरणीसाठी सुप्रिया सुळे यांच्याकडे माईक दिला होता. पण शरद पवार, प्रतिभा पवार सह अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना जाहीर प्रतिक्रिया देण्यापासून रोखलं.
प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना थोडं समजावून पवारांना दुपारच्या जेवणासाठी, विश्रांतीसाठी घरी जायला द्यावं. आम्ही तुमच्याच मनातील निर्णय घेऊ असं म्हणत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.
एनसीपीमध्ये नेते, कार्यकर्ते शरद पवारांच्या हयातीमध्ये दुसरा अध्यक्ष मान्य नसल्याचं म्हटलं आहे. त्याऐवजी कार्याध्यक्ष किंवा अन्य पद निर्माण करून आगामी अध्यक्ष घडवण्याचं काम करावं असा पर्याय सुचवला आहे. पण आता शरद पवार नेमका काय निर्णय घेतात याकडे सार्यांचेच लक्ष लागले आहे.