राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार ज्योती कलानी करणार शिवसेनेत प्रवेश?
Jyoti Kalani (Photo Credits: File Photo)

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांमध्ये अदलाबदली, मेगाभरतीचा प्रकार जोरदार सुरु आहे. त्यातच आता टाइम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या बातमीनुसार, उल्हासनगरमधील राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार ज्योती कलानी (Jyoti Kalani) या शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी त्या भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा रंगत होती.

ज्योती कलानी यांचा मुलगा ओमी कलानी (Omie Kalani) यांच्या संघाची उल्हासनगर पालिकेमध्ये भाजपासोबत युती आहे. तसेच त्यांची पत्नी पंचम कलानी (Pancham Kalani) भाजपच्या तिकिटावरून निवडून आलेल्या उल्हासनगरच्या महापौर आहेत.

हेही वाचा- महाराष्ट्राच्या राजकारणातील धक्कादायक दिवस; काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गजांचा आज भाजप प्रवेश; जाणून घ्या प्रमुख चेहरे

त्यामुळे संपुर्ण कलानी कुटूंबाची भाजपाची खूपच जवळीक असल्याचे येथे स्पष्ट दिसून येते. याच धर्तीवर आता ओमी कलानी यांच्या आई ज्योती कलानी या भाजपामध्ये प्रवेश करतील अशी आशा होती. मात्र 2014 च्या निवडणुकीत ज्योती कलानीच्या विरोधी भाजपाकडून एकमात्र उभे राहिलेले माजी आमदार कुमार ऐलानी हे मोदी लाट असतानाही हरले होते. त्यामुळे भाजपमधील कार्यकर्त्यांनी ज्योती कलानींच्या भाजप प्रवेशाला विरोध केला.