Eknath Khadse | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP ) पक्षाचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) हे अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate ) कार्यालयात जाणार नाहीत. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी स्वत:च ट्विटरवरुन याबाबत खुलासा केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून आपल्याला समन्स प्राप्त झाले होते. त्यानुसार आज ईडी (ED) कार्यालयात जाणारच होतो. परंतू, आरोग्याबाबत तक्रारी असल्याने डॉक्टरांनी 14 दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे 14 दिवसानंतर पुन्हा ईडी कार्यालात उपस्थित राहणार आहे. आपण ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

एकनाथ खडसे यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार आज (30 डिसेंबर 2020) ते ईडी कार्यालयात उपस्थित राहणार होते. त्यासाठी खडसे हे जळगावहून मुंबईला आलेदेखील आहेत. परंतू, दरम्यान, त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवली. खडसे यांना सर्दी, ताप, खोकला आणि इतर काही कोरोना सदृश्य लक्षणे जाणवली. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. यावर डॉक्टरांनी त्यांना 14 दिवस विश्रांती घेण्यास सांगितले. (हेही वाचा, ED Notice To Eknath Khadse: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीकडून नोटीस)

दरम्यान, एकनाथ खडसे यांनीच कोरोना व्हायरस चाचणी करण्या आली आहे. चाचणीचा अहवाल अद्याप प्रलंबीत आहे. त्यामुळे खडसे यांच्या कोरोना संसर्गाबाबत निश्चित माहिती उपलब्ध होई पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.दरम्यान, ईडी कार्यालयानेही त्यांना विश्रांती घेऊन पुन्हा चौकशीस येण्यास परवानगी दिल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.

एकनाथ खडसे यांना या आधीही कोरोना व्हायरस संसर्ग झाला होता. खडसे यांनी भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर काही काळातच खडसे यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन व्हावे लागले होते. खडसे यांना या आधी 19 ऑक्टोबर या दिवशी कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर अल्पावधितच खडसे यांनी कोरोनावर मात केली.

महाविकासआघाडी सरकारचा भाग असलेल्या घटक पक्षातील अनेक राजकीय नेत्यांना ईडीची नोटीस आली आहे. यात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी आणि इतरही काही नेत्यांचा समावेश आहे. या आधी शरद पवार, राज ठाकरे यांच्यासह आणखी काही नेत्यांना ईडीची नोटीस आली आहे.