राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांची शिवसेनेत घरवापसी? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
छगन भुजबळ (फोटो सौजन्य-Twitter)

राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे भुजबळ यांची शिवसेनेत घरवापसी होणार असल्याचे कळताच राजकीय वर्तुळात याबाबत चर्चांना उधाण आले आहे. उद्या भुजबळ मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार असल्याचे ही बोलले जात आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी भुजबळ यांच्या पक्षप्रवेशाबाबच काही भुमिका मांडली नाही. तर वेळ आल्यास सर्व काही कळेल असे विधान फक्त केले होते.

राष्ट्रवादी पक्षातील नेते मंडळी यांची शिवसेनेत इनकमिंग अद्याप सुरुच आहे. याच पार्श्वभुमीवर छगन भुजबळ यांनी शिवसेनेत तब्बल 29 वर्षांनी घरवापसी होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. परंतु काही दिवसांपूर्वी नाशिक येथील कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी भुजबळ यांना पक्षात घेऊ नये असा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्या समोर कार्यकर्त्यांनी उपस्थित केला होता.

तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नाशिक यात्रेवेळी सुद्धा भुजबळ यांनी उपस्थिती लावली नव्हती. या प्रकारामुळे आणखीनच भुजबळ यांच्या संबंधित नव्या गोष्टी बोलल्या गेल्या. काही वर्षांपूर्वी नाशिक हा भुजबळ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख होती. परंतु सुप्रिया सुळे यांच्या यात्रेदरम्यान आपल्याच पूर्वीच्या बालेकिल्ल्यात अनुपस्थित राहिले होते.(चेंबूर माजी नगरसेविका निलम डोळस यांचा शिवसेनेत प्रवेश, खासदार नारायण राणे यांना मोठा धक्का)

भुजबळ यांची राजकरणामधील वाटचाल 60 च्या दशकात झाली. त्यावेळी त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास जिंकला होता. त्यानंतर 25 वर्ष भुजबळ यांनी शिवसेनेत राहून महापौर, आमदार अशा पदांचा कारभार सांभाळला होता. मात्र 1991 मध्ये शिवसेने सोबत भुजबळ यांचे मतभेद झाल्याने त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्याचसोबत राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना काँग्रेस पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर भुजबळ यांनी सुद्धा काँग्रेसला अलविदा करत राष्ट्रवादीत प्रवेश केला.