Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अतिवृष्टी झालेल्या नुकसानग्रस्त (Natural Disasters)  भागाची पाहणी करण्यासाठी कालपासून (18 ऑक्टोबर) 2 दिवसीय मराठवाडा पाहणीदौरा सुरु केला आहे. या दौ-यादरम्यान शरद पवारांनी झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. तसेच नुकसानग्रस्तांशी चर्चा देखील केली. त्यानुसार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे. काल तुळजापूर दौ-यानंतर (Tuljapur Visit) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान इतके मोठे आहे की त्यासाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून शक्य तितके जास्त कर्ज घ्यावे अशी विनंती करणार असल्याचे शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्र: अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी NCP अध्यक्ष शरद पवार घेणार पंतप्रधानांची भेट, केंद्राकडे करणार भरीव मदतीची मागणी

'आधी कधी आलं नाही, इतकं मोठं संकट राज्यावर आलं आहे. गावपातळीवर रस्ते खराब झाले आहेत. यामध्य मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. महाराष्ट्रावर ऐतिहासिक आर्थिक संकट आहे' असे शरद पवार म्हणाले. "अतिवृष्टीचा ऊसाला मोठा फटका बसला आहे. मोठया प्रमाणावर ऊस गाळपासाठी वापरता येणार नाही. सोयाबीनचही मोठं नुकसान झालंय" असे शरद पवार यांनी सांगितले.

यासोबतच 'नुकसान भरून काढण्यासाठी कर्ज घेण्याला पर्याय नाही. पिक विम्यासंदर्भात शिथिलता आणण्यासाठी केंद्राकेड मागणी करणार आहे. हा प्रश्न खूप मोठा आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन यावर मात करायला हवी. केंद्र व राज्य सरकार दोघांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा' असेही ते यावेळी म्हणाले. या संदर्भात केंद्राकडून मदत मागण्यासाठी ते लवकरच काही खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट देखील घेणार आहेत.