Sharad Pawar On Kangana Ranaut statement: कंगना रनौत हिच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया म्हणाले, 'या लोकांना उगाच अधिक महत्त्व दिलं जातंय'
Sharad Pawar, Kangana Ranaut | (Photo credit: archived, edited, symbolic images)

मुंबई शहराची तुलना पाकव्याप्त कश्मीर (POK) सोबत करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्या वक्तव्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटली. काही काळ कंगना रनौत आणि शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) असाही 'सामना' रंगला प्रसारमाध्यमांतूनही या प्रकरणाल जोरदार प्रसिद्धी मिळाली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिल्यांदाच या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अशी वक्तव्ये करणाऱ्यांना आपण उगाच अधिक महत्त्व देतो आहोत, असे शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबई शहर आणि मुंबई पोलीस यांचा राज्यातील जनतेला कित्येक वर्षांचा अनुभाव आहे, असेही पवार म्हणाले.

शरद पवार हे आयोजित पत्रकार परिषदेत बुधवारी बोलत होते. या वेळी बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, मुंबई आणि राज्यातील पोलिसांबाबत काही आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना आपण अधिक महत्त्व देतो आहोत असं मला वाटतं. अशा वक्तव्यांमुळे जनमानसांवर त्याचा काय परिणाम होतो याचा विचार आपण करायला हवा. राज्यातील जनतेला मुंबई पोलीस आणि मुंबई शहराचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे अशा विधानांना आपण गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असेही पवार म्हणाले.

कंगना रनौत हिचे कार्यालय अधिकृत की अनधिकृत याबाबत माहिती नाही. मुंबई महापालिका कायद्यानुसारच काम करते. परंतू, अशा विशिष्ट वेळेत कारवाई केल्यामुळे लोकांच्या मनात शंका उत्पन्न झाल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे. कोणी मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली तर त्याला अधिक महत्व देऊ नये. कारण या लोकांना जनता गांभीर्याने घेत नाही, असेही पवार म्हणाले.(हेही वाचा, Kangana Ranaut Office Demolition: कंंगना रनौत च्या ऑफिस चे मोठे नुकसान, सरकारला मोबदला मागणार- वकील रिझवान सिद्दिकी )

दरम्यान, मुंबई महापालिकेने कंगना रनौत हिच्या ज्या कार्यालयावर हातोडा चालवला, बुलडोजरने कारवाई करत पाडकाम केले त्या विरोधात कंगना रनौत हिने वकिलाच्या माध्यमातून न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयाने महापालिकेच्या कारवाईला तूर्तास स्थगिती दिली आहे. त्यामुळे कंगना रनौत हिच्या कार्यालयातील पाडकाम सध्या थांबवण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला कंगना रनौत हिने पालिकेने केलेल्या कारवाईचे फोटो ट्विट करत पाकिस्तान असा पुन्हा एकदा उल्लेख केला आहे.