Sharad Pawar On Death Threat: धमकी देऊन आवाज बंद होईल हा गैरसमज, कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबादारी राज्य सरकारची- शरद पवार
Sharad Pawar (Photo Credit - Twitter)

जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया दिली. धमकी देऊन आवज बंद करता येतो असे जर कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. आपण धमकीची चिंता करत नाही, अशा स्पष्ट शब्दांत शरद पवार (Sharad Pawar On Death Threat) यांनी धमकी देणाऱ्यांना सुनावले आहे. तसेच, देशात लोकशाही आहे. आपले मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र राज्यात कायदा वय सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची असते. ज्यांच्या हाता राज्य आणि देश चालविण्याची जबाबदारी असते त्यांना ती टाळता येत नाही, अशी कानपिचकीही पवार यांनी राज्य सरकारला दिली.

राजकीय नेत्यांना आलेल्या धमक्यांनी आजचा दिवस विशेष गाजला. शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी एका ट्विटर हँडलवरुन देण्यात आली. शिवाय, पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअॅपवरही अज्ञात व्यक्तीने धमकी दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात खळबळ उडाली. खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वत: या धमकीची गांभीर्याने दखल घेत मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तसेच, शरद पवार यांना आलेल्या धमकीबद्दल निवेदन दिले. या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राखी जाधव, मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. (हेही वाचा, Sharad Pawar Gets Death Threat: शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांकडे तक्रार)

दरम्यान, शरद पवार यांच्या नंतर शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनाही अज्ञात व्यक्तीने फोनवरुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे एकाच वेळी राज्यातील तीन राजकीय आणि महत्त्वाच्या नेत्यांना धमक्या आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (हेही वाचा, Sanjay Raut Gets Death Threat: संजय राऊत आणि बंधू सुनील यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ)

शरद पवार, संजय राऊत आणि सुनील राऊत यांना आलेल्या धमकीनंतर राज्य सरकार आणि पोलीस अधिकारीही सतर्क झाले आहेत. राज्यात धमकीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला शरद पवार यांना आलेली धमकी खपवून घेतले जाणार नाही. मी स्वत: पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आहे. धमकी देणाऱ्याला लवकरच शोधून काढले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.