Nawab Malik on Sameer Wankhede | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) आणि अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे Sameer Wankhede) यांच्यात पाठिमागील काही महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष अधिकच वेग घेतो आहे. नवाब मलिक दररोज पत्रकार परिषद किंवा एखादे ट्विट करत वानखेडे यांच्यावर हल्ला चढवत आहेत. दररोज नवा दावाही करत आहेत. नवाब मलिक यांनी आजही (22 नोव्हेंबर) आपल्या ट्विटर हँडलवर समीर वानखेडे यांचा आणखी एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाच्या निकाहनाम्याचा असल्याचा मलिक यांचा दावा आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा फोटो ट्विटरवर शेअर करत “कबूल है, कबूल है, कबूल है… यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?” अशी कॅप्शनही दिली आहे. या फोटोत दोन व्यक्ती दिसतात. त्यातील एक समीर वानखेडे (गोल टोपी) आणि दुसरा व्यक्ती (पांढरी दाढी) हा मुस्लिम रितिरीवाजाप्रमाणे विवाह लावणारा काझी असल्याचे समजते. हा फोटो समीर वानखेडे यांच्या निकाहावेळचा असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. या फोटोमध्ये समीर वानखेडे हे कथीत रुपात निकाहनाम्यावर स्वाक्षरी करताना दिसत आहेत. मलिक यांनी या फोटोसोबत वानखेडे यांच्या निकाहाचा निकाहनामाही ट्विटरवर पोस्ट केला आहे. (हेही वाचा, Sameer Wankhede Case: प्रकाश आंबेडकरांनी दर्शवला समीर वानखेडेंना पाठींबा, केलं 'असं' वक्तव्य)

ट्विट

नवाब मलिक यांनी साधारण मध्यरात्रीच्या सुमारास हा फोटो आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. मलिक यांनी शेअर केलेल्या फोटोला काही वेळातच जवळपास तीन हजार पेक्षाही अधिक वेळा शेअर करण्यात आला आहे. तर लाईक्सची संख्याही चांगलीच वाढत आहे. समीर वानखेडे यांनी आपल्या विवाहाबाबत या आधीच स्पष्टीकरण दिले आहे. वानखेडे यांनी या आधी विवाहाबात स्पष्टीकरण देताना म्हटले की, ''माझी आई मुस्लीम होती, बाबा हिंदू आहेत. मी दोघांवरही खूप प्रेम करतो. माझ्या आईने मुस्लीम पद्धतीने विवाह करण्यास सांगितला तो मी केला. कारण मी आईचा शब्द पाळला, मी गुन्हा केला नाही. ज्या महिन्यात निकाह झाला त्याच महिन्यात मी विशेष विवाह कायद्यानुसार (Special Marriage Act) नोंदणी करून घेतली. मी जे केलं तो गुन्हा नाही आहे.''