Navneet Kaur Rana (Photo Credit: ANI)

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदार संघातील खासदार नवनीत कौर राणा (Navneet Kaur Rana) यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे आणि फसवणुकीने राणा यांनी हे प्रमाणपत्र मिळवले असल्याचा निष्कर्ष नोंदवत जातवैधता प्रमाणपत्र सहा आठवड्यात जात पडताळणी समितीकडे परत करण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आणि आपली खासदारकी वाचवण्यासाठी नवनीत राणा यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अडसूळ यांचा पराभव करून अनुसूचित जातीसाठी आरक्षित जागेवर नवनीत राणा या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबई उपनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडून अनुसूचित जात प्रमाणपत्र मिळवले. मुंबई उपनगर जिल्हा जात पडताळणी समितीनेही 3 नोव्हेंबर 2017 रोजी ते प्रमाणपत्र वैध ठरवले, असा आरोप अडसूळ यांनी याचिकेद्वारे केला होता. नवनीत राणा यांनी पती रवी राणा यांच्या राजकीय प्रभावाचा वापर करून राणा यांनी बनावट जात प्रमाणपत्र मिळवल्याचे अडसूळ यांनी याचिकेत म्हटले आहे. हे देखील वाचा- Shiv Sena on BJP: 'कालच्या शिवप्रसादावरच थांबा, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका' संजय राऊत यांचा गर्भित इशारा

नवनीत राणा यांचा जन्म 3 जानेवारी 1986 रोजी मुंबईत झाला आहे. तसेच त्यांनी तेलुगू, पंजाबी, हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत काम केले आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी नवनीत राणा या मॉडेलिंग करत होत्या. मात्र, 2011 साली रवी राणा यांच्याशी लग्न झाल्यानंतर नवनीत राणा यांनी चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली होती. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढताना नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा 36 हजार मतांनी पराभव केला आहे.