शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) हे मराठी अस्मितेचे प्रतीक आणि बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांची वास्तू आहे. शिवसेना (Shiv Sena) भवनाकडे वाकड्या नजरनेने पाहाल तर परसाद मिळणारच. हे मी ऑन रेकॉर्ड सांगत आहे,असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. कालच्या 'शिवप्रसादावरच थांबा, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका', अशा शब्दातही राऊत यांनी गर्भित इशारा दिला. शिवसेना भवन येथे काल (16 जून) शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. या प्रकाराबाबत विचारले असता प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
राम मंदिर जागेबाबत केल्या जाणाऱ्या आरोपांवरुन सामना संपादकीयात टीका करण्यात आली होती. त्याविरोधात भजप युवा मोर्चाने फटकार मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चा द्वारे शिवसेना भवन समोर आंदोलन करण्यात येत होते. या वेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. रात्री उशीरपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. (हेही वाचा, Shiv Sena Bhavan: शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवन समोर राडा)
ज्यांनी ज्यांनी आणि जेव्हा जेव्हा शिवसेना भवन कडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा अशाच प्रकारे राडा झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. संजय राऊत म्हणाले शिवसेना भवनावर कोणी चाल करत असेल तर शिवसैनिक आणि मराठी माणूस काय गप्प बसेल का?
राम मंदिर जमीन खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. जर असा आरोप करण्यात आला असेल तर त्याचा खुलासा करुन सत्यता पुढे आणण्यात यावी. जर हे आरोप राम मंदिराच्या बदनामीबाबत केले जात असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, असं सामनाच्या अग्रलेखात स्पष्टपणे म्हटले आहे. यात भाजपवर कोणताही थेट आरोप नाही. तरीही ही टीका भाजपला इतकी का झोंबली? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.
राम मंदिर न्यास ही स्वतंत्र संस्था आहे. त्यात भाजपचे कोणी कार्यकर्ते आहेत काय? असा सवाल विचारतानाच जर एखाद्या श्रद्धेच्या वास्तूबाबत खुलासा विचारला तर तो काही गुन्हा ठरतो का? असेही संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, ज्यांनी काल शिवसेना भवनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांना काल प्रसाद मिळाला आहे, आमच्या दृष्टीने तो विषय संपला असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.