केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज (13 जुलै) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्च 2025 पासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्री Kinjarapu Rammohan Naidu आणि मोहोळ यांनी विमानतळाची पाहणी केली आहे. नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई,पुणे, ठाणे, कल्ल्याण आणि पश्चिम महाराष्ट्र सोबत असलेली कनेक्टिव्हीटी सुधारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
विमानतळाचं नाव कैलासवासी दि बा पाटील यांच्या नावे ठेवण्याला त्यांनी सहमती असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी मॅनेजमेंट सोबत चर्चा देखील करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ज्यांनी जागा विमानतळासाठी दिली त्यांना वार्यावर सोडलं जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी खाडीत जलसमाधी आंदोलन केले होते. विमानतळासाठी गावे उठवली, शेतकरी, ग्रामस्थांच्या जमिनी ताब्यात घेतल्या पण दिलेली आश्वासने सिडकोने पूर्ण केली नाहीत, असा गंभीर आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
महाराष्ट्र परिषद निवडणुकीच्या निकालांबद्दल बोलताना मोहोळ यांनी महायुती आघाडीच्या कामगिरीचे कौतुक केले आणि काँग्रेसला त्यांच्या अंतर्गत आव्हानांचे आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले आहे. सत्ताधारी महायुती आघाडीने शुक्रवारी विधान परिषदेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीत लढलेल्या सर्व नऊ जागा जिंकल्या, तर विरोधी महाविकास आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) च्या पाठिंब्याचा उमेदवार पराभूत झाल्याने मोठा धक्का बसला आहे.