Navi Mumbai: परदेशात नोकरी देण्याच्या नावाखाली 30 जणांना 55 लाखांचा गंडा
Fraud (Photo Credits: IANS) | Representational Image

नवी मुंबई (Navi Mumbai) मधील नेरुळ पोलिसांनी (Nerul Police) परदेशात नोकरी देणाऱ्या एका एजन्सीच्या डारेक्टरविरुद्ध धोकाधाडीचा गुन्हा दाखल केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ही एजन्सी नवी मुंबईमधील सीवूड्स (Seawoods) येथे आहे. केरळ (Kerala) मधील नोकरी शोधात असलेल्या 30 व्यक्तींचे 55 लाख रुपये बुडवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 30 व्यक्तींना अबुदाबीमधील एका खोट्या कंपनीचे बनावट वर्क परमिट एजन्सीने बनवून दिले होते.

नेरुळ मधील एक मेकॅनिकल इंजिनियर शहाजुद्दीन हनिफा (36) याने या विरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली. आरएम मॅरिटाईन सर्व्हिसेस असे या परदेशी नोकरी देणारी एजन्सीचे नाव असून महेश शेवाती या कंपनीचे डिरेक्टर होते. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनिफा मार्च 2019 मध्ये शेवाती यांना त्यांच्या सीवूड्समधील ऑफिसमध्ये भेटला होता. परदेशी नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने त्याने हनिफाचे ऑफिस गाठले होते. परदेशात नोकरी देण्यासाठी शेवातीने हनिफाकडून 3 लाख रुपयांचे कमिशन मागितले. परंतु, जर हनिफाने जॉबच्या शोधात असलेल्या अजून 50 जणांना एजन्सीमध्ये आणले तर हनिफाचे कमिशन रद्द करण्यात येईल, असे शेवाती म्हणाले.

हनिफाने एकूण 29 जणांना परदेशी काम करण्यासाठी मनवले आणि त्यांना शेवाती यांच्याकडे नेले. या सर्व व्यक्तींना अबुदाबीमध्ये हेल्पर्सचे जॉब मिळवून देण्याचे शेवातींनी आश्वासन दिले. यासाठी प्रत्येक व्यक्तींकडून त्यांनी 2 लाख रुपये घेतले.

या सर्व 29 जणांनी मिळून सुमारे 52.20 लाख रुपये शेवाती यांच्या अकाऊंटमध्ये जमा केले. त्यानंतर हनिफाने स्वत:च्या नोकरीसाठी 2.70 लाख रुपये जमा केले. हे सर्व अबुदाबीमध्ये पोहचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांना दिलेला वर्क परमिट हा खोटा असून त्या नावाची कोणतीच कंपनी तिथे नाही.