सध्या ऑनलाईन गेममधील प्रसिद्ध पबजी (PUBG) खेळाचे जगभरात लाखो युजर्स आहेत. तसेच तरुणाईमध्ये पबजी गेम खेळण्याची मोठी क्रेझ दिसून येत आहे. मात्र पबजी गेम खेळल्याचे काही दुष्परिणाम सुद्धा दिसून आले आहेत. काहींनी आत्महत्या तर काहींनी गेम खेळण्यास पालकांनी विरोध दर्शवल्याने त्यांची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. याच परिस्थितीत अजून एक नवीन प्रकार पबजी संबंधित समोर आला आहे. तर नवी मुंबई (Navi Mumbai) येथे राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलाला पालकांनी पबजी गेम खेळताना ओरडल्याने घर सोडले आहे.
नवी मुंबई येथील नेरुळ परिसरात सदर 16 वर्षीय मुलगा राहतो. तर रात्रीच्या वेळेस पालक झोपले की मुलगा रात्रभर पबजी गेम खेळत असे. यावरुन पालकांनी बऱ्याच वेळा दम सुद्धा दिला होता. तसेच पबजी गेम खेळण्याचे वेड लागल्याने मुलगा कॉलेजमध्ये जाणे सुद्धा वारंवार टाळत होता. गेल्या आठवड्यात मुलाला त्याच्या पालकांना रात्री गेम खेळत असताना पुन्हा ओरडले. पालकांनी ओरडल्याचा राग मनात ठेवून मुलाने घरातून पळ काढला. या प्रकरणी सदर मुलाच्या पालकांनी पोलीस स्थानकात तो बेपत्ता झाल्याची तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांकडून मुलाचा शोध घेतला जात आहे. मात्र अद्याप मुलगा पोलिसांना सापडलेला नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले आहे.(पुणे: PUBG खेळावरुन वाद झाल्याने तरुणावर प्राणघातक हल्ला)
परंतु नवी मुंबई सायबर सेल यांनी सदर मुलाचे पबजी अकाउंट तपासून पाहिले. त्यावेळी मुलगा पबजी गेमच्या शेवटच्या लेव्हलला पोहचल्याचे समोर आले. तसेच मुलाच्या मित्रांना सुद्धा त्याच्याबद्दल विचारले. यावर सदर मुलाच्या एका मित्राने त्याला पुणे येथील एका सायबर कॅफेत नोकरीची संधी देतो असे सांगितले होते. त्याचसोबत पबजी गेम खेळण्यावर कोणतेही बंधन नसल्याचे ही त्याला सांगण्यात आले असल्याचे मित्राने पोलिसांना सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांकडून बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध घेतला जात आहे.