आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर भाजपने (BJP) मतदारांना खूश करण्यासाठी शहरात गरबा महोत्सवाचे (Garba Festival) आयोजन केले आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात निर्बंधाशिवाय सण-उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोविड नंतर इतर धर्मांना त्यांचे सण साजरे करण्याची परवानगी मिळत असे, मात्र हिंदू सणांना परवानगी न दिल्याचा आरोप भाजपने महाविकास आघाडी सरकारवर नेहमीच केला आहे.
मात्र, आता महाराष्ट्रात हिंदुत्वाचे सरकार आले असून, दहीहंडी आणि गणपती ज्या पद्धतीने साजरे केले गेले, त्याप्रमाणे नवरात्रोत्सवही जल्लोषात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी दिली आहे. नुकतेच भाजप नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आगामी नवरात्रोत्सव मुंबईत मोठ्या दिमाखात साजरा होणार असल्याची माहिती दिली.
मुंबईतील मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांचा गरबा कार्यक्रम आयोजित केला आहे. मिहीर कोटेचा म्हणाले की, दहीहंडी आणि गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवाचे आयोजन मुंबई भाजपने केले आहे. शिवडी येथील अभ्युदय नगर येथील शहीद भगतसिंह मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, मुंबईतील सर्वात मोठा उत्सव म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जाईल, असे नियोजन करण्यात आले आहे. (हेही वाचा: दांडिया-गरबा कार्यक्रमामध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश मिळावा; विश्व हिंदू परिषदेची सरकारकडे मागणी)
हा कार्यक्रम 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. कार्यक्रमाला सरकार शेवटच्या 2 दिवसात 12 पर्यंत परवानगी देईल, अशी आशा व्यक्त केली गेली आहे. अवधूत गुप्ते व्यतिरिक्त भाजपने या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गायिका वैशाली सामंत आणि इतर सेलिब्रिटींना सहभागी करून घेतले आहे. भाजपने या कार्यक्रमासाठी वरळी परिसरात जांबोरी मैदान, महालक्ष्मी रेसकोर्स आणि अभ्युदय नगर या तीन ठिकाणांची निवड केली होती. मात्र, अखेर अभ्युदय नगरचा पर्याय स्वीकारला.